Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, April 3, 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय टाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


   मुंबई, दि. ०३ : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.१४ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी  देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. या जयंती सोहळ्याचे राज्यशासन, पोलिस आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाने योग्य समन्वयाने भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजीच्या १३४ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते. 

   मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रम व अन्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने होत असलेल्या तरतुदीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करावे. चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्विरित्या पार पाडावी. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबत दक्षता घेण्यात यावी. 

 चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आणि नागरिकांसाठी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात यावी. त्यामध्ये उन्हापासून संरक्षणासाठी मंडप उभारावेत. तसेच उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था असावी. तसेच दादर आणि संबंधित परिसरात वाहतूक पोलिसांनी रहदारीचे योग्य नियंत्रण ठेवावे व जागोजागी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर स्टेशन ते चैत्यभूमीदरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना ये-जा करण्यास सुविधा होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

    या बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, "लोकराज्य" चा विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिध्दी याबाबत चर्चा झाली व याबाबत निर्देश देण्यात आले. 

   बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली.

  यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

   बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इकबाल सिंह चहल, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, भन्ते डॉ.राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

No comments:

Post a Comment

फॉलोअर