वाशिम / शेंदुरजना (अ) (दिग्रस साप्ताहिक एक्सप्रेस.) वाशिम तालुक्यातील ग्राम अडोळी गाव विक्रीस निघाल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सोमवार, ६ एप्रिल रोजी अडोळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. या ठिय्या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून, ग्रामस्थांनी अडोळी फाटा येथे वाशीम–रिसोड मार्ग अडवून धरला.
अडोळी गावातील नागरिकांनी २ एप्रिलपासून गावात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या दरम्यान तहसीलदार व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली असून खासदारांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, राज्य सरकारमधील जबाबदार व्यक्ती येऊन त्यांच्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
सोमवारी आंदोलन अधिक तीव्र करत ग्रामस्थांनी अडोळी फाटा येथे रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
या आंदोलनात सतीश इढोळे, बालाजी मोरे, सोनुताई मुळे, प्रविण मते, नामदेव पतंगे, मनोहर सावके, शांतीराम भालके, राजेंद्र खोलगाडे, समाजसेवक राजकुमार पडघान, दौलत पडघान, रामेश्वर खंडारे, शाळीग्राम इढोळे, भागवत इढोळे, वसंतराव इढोळे, गजानन इढोळे यांच्यासह शेकडो शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
यावेळी “सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे”, “मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामुळे वाशीम–रिसोड रस्ता वर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
No comments:
Post a Comment