मानोरा -- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) तालुक्यातील जगविख्यात तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे राज्य शासनाकडून बंजारा समाजाचे पुरोगामी विचाराचे महान संत सेवालाल महाराज यांची समाधी असलेल्या गावात प्रचंड गाजावाजा करून निर्माण करण्यात आलेल्या बणजारा विरासत/नगारा वास्तू भवन बघण्यासाठी दऱ्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या, आर्थिक, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या प्रचंड माघारलेल्या समाज बांधवांकडून थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ५००/रुपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे व श्रीराम नवमीच्या धार्मिक प्रसंगी येणाऱ्या लक्षावधी भाविक भक्तांकडून प्रतिव्यक्ती पाच रुपये कर आकारून मुस्लिम धर्मीय शासन काळात गैर मुस्लिम धर्मियांकडून आकारल्या जाणाऱ्या जिझीया कर आकारणाऱ्या क्रूर शासकांनाही विद्यमान सत्ताधीशांनी फिके पाडल्याची जळजळीत प्रतिक्रिया महाराष्ट्र व देशभरातून तालुक्यात येणाऱ्या पर्यटक, भाविक भक्तांकडून पुढे येत आहे.
बंजारा विरासत या वास्तूमध्ये बंजारा समाजाचा सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिप्रेक्ष्यातून बहुआयामी असा वारसा देखावे, चलचित्र आणि संगीताच्या संयोजनातून डोळ्यासमोर उभा करण्यात आलेला आहे ज्याचे लोकार्पण प्रचंड गाजावाजा करून गतवर्षी देशाच्या पंतप्रधानांच्या हातून लक्षावधी समुदाय जमवून करण्यात आला होता.
शासनाकडून निर्मित ही भव्य वास्तू आपल्या कुटुंबीयासमवेत प्रत्येकाने आवर्जून बघण्याचे जाहीर आवाहन व्यासपीठावरून देशाच्या पंतप्रधानांनी वास्तु लोकार्पणाच्या वेळी केले होते.
श्रीराम नवमीच्या धार्मिक पर्वावर तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे जगभरातून एकवटणाऱ्या गोरगरीब बंजारा बांधवांची गर्दी लक्षात घेऊन सध्याच्या सत्ताधिशांनी ही वास्तू बघण्यासाठी बहुजन समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला परवडणार नाही एवढी तब्बल ५००/रुपये प्रवेश फी लागू केल्याने क्रूर मुघल शासक औरंगजेबाची आठवण आधुनिक युगात सध्याच्या शासन व प्रशासनाच्या आर्थिक पिळवणुकीमुळे पुढे येत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया या वाढीव दरामुळे उमटत आहेत. बंजारा विरासत या वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी आकारलेली प्रवेश फी कमी की काय यावर कडी करण्याचा प्रकार स्थानिक ग्रा. पं. प्रशासनाकडून पोहरादेवी हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिक, भाविक भक्तांकडून प्रतिव्यक्ती पाच रुपये प्रवेश फी (कर) आकारून मुस्लिम शासक मोहम्मद बिन कासिम,सुलतान फिरोज तुघलक, कुतुबुद्दीन ऐबक आणि औरंगजेब यांनी गैर मुस्लिम धर्मीयांवर लागू केलेल्या कराची पुनरावृत्ती नवमी यात्रेदरम्यान कर आकारून केल्याचे बोलले जात आहे. गरीब, कष्टकरी आणि ऊसतोड काम करणाऱ्या बहुजन समाजाच्या नागरिक व भाविक भक्तांवर तीर्थक्षेत्र प्रवेश व विरासत वास्तुप्रवेशासाठी आकारल्या जात असलेल्या दरावरून शासन व प्रशासनावर आसूड ओढले जात असून आपण आधुनिक युगात जगत आहोत की मुस्लिम धर्मीय शासन काळात असा सवाल सुद्धा उपरोक्त कर दरांवरून सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे.
*गोरगरीबेन दाडन खाय वोर सात पिढी नरकेम जाय !*
गरीब आणि भोळ्या समाज बांधवांना फसवून स्वतः गब्बर बनणाऱ्यांच्या सात पिढ्यांना नरकात जावे लागेल या संत सेवालाल महाराज यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीची भीती सुद्धा वर्तमान शासन आणि शासनाच्या ह्या कृतीवर मौन बाळगणाऱ्या महाराज परिवारातील सदस्यांना नाही की काय ? असा सवाल ही या निमित्ताने उपस्थित केल्या जात आहे.
बॉक्स--
*क्रांतिकारी विचारांचे महान संत यांच्या वंशातील व्यक्ती सध्या सत्ताधारी पक्षाचे विधिमंडळाच्या ज्येष्ठ सभागृहाचे सभासद आहेत. महाराज परिवारातील इतर सदस्यांचे सर्वोच्च सत्ताधीशांसी प्रचंड सलगी असूनही तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे शासनाकडून नागरिक व भक्तगणांची केल्या जात असलेल्या आर्थिक लुटी बाबत मौन बाळगले जात असल्याने गोरसेना या सामाजिक संघटने कडून तीव्र आक्षेप नोंदवून जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारा उपरोक्त तुगलक व मुघल मानसिकतेच्या आर्थिक लुटीचा फतवा मागे घेण्याची मागणी केली आहे.*
No comments:
Post a Comment