पोहरादेवी मानोरा, (जगदीश राठोड) : बंजारा समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव आणि श्रीराम नवमी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले की, पोहरादेवीचा विकास हा शासनाची प्राथमिकता असून, उर्वरित कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "बंजारा समाज प्राचीन असून, त्यांच्या पराक्रमाचा उल्लेख ऋग्वेदातही आढळतो. समाजाच्या विकासासाठी शासनाने विविध योजना आणि सुधारणा राबवल्या आहेत. पोहरादेवीच्या विकासासाठी महत्त्वाची कामे पूर्ण झाली असून, भाविकांच्या सोयीसाठी उर्वरित प्रकल्प लवकरच पूर्ण केले जातील."
कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार सईताई डहाके, संजय कुटे, राजेश राठोड, तुषार राठोड यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. तसेच श्री जगदंबा मातेच्या महाआरतीनंतर जन्मोत्सव आणि पाळणा सोहळा पार पडला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
No comments:
Post a Comment