दिग्रसच्या सेवाभावी तरुण नेतृत्वाची दुर्दैवी एक्झिट – केतन यांना श्रद्धांजली
विश्वासच बसत नाही…
एक असं व्यक्तिमत्त्व, जो चौवीस तास गरीब, वंचित, उपेक्षित आणि अन्यायग्रस्तांसाठी झटणारा, एक निःस्वार्थ कार्यकर्ता, प्रामाणिक, निर्व्यसनी, तडफदार, आणि सेवाभावी नेतृत्व… तो केतन… आज आपल्यात नाही, ही बातमी मनाला हादरवून टाकणारी आहे.
आजही ध्यानी मनी बसत नाही की केतन आपल्याला असा अचानक आणि कायमचा सोडून जाईल. जणू आयुष्याची नव्याने सुरुवात होत असताना, नवविवाहित जीवनाचा प्रवास सुरु झाल्यावर… त्याच्या जीवनातली सर्वात सुंदर इनिंग अवघ्या काही क्षणांतच संपून गेली.
केतन… संकटात सापडलेल्या शेकडो कुटुंबांचा आधार होता.
त्याच्या डोळ्यात इतरांच्या दुःखासाठी पाणी, आणि ओठांवर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची कला होती.
माझा निकटचा बालमित्र आणि स्व. हेमंत चांचा गुणी सुपुत्र… अल्पावधीत त्याने आपल्या सेवा वृत्तीने संपूर्ण दिग्रस मध्ये एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली होती.
तो सर्वांचा लाडका, प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत होता.
मी त्याला वारंवार आत्मविश्वासाने म्हणायचो –
"येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने तुझं विजय निश्चित आहे."
कारण लोकांनी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं, विश्वास टाकला होता.
मित्र असो, पक्ष असो, की कुटुंब – केतनने प्रत्येकासाठी आपलं सर्वस्व दिलं.
त्याचं हसतमुख व्यक्तिमत्त्व, आत्मीयता आणि झटणारी वृत्ती हे सर्व आता केवळ आठवणीत उरेल.
आजही वाटतंय, हे खरं नसावं… कोणीतरी सांगावं की केतन ठिक आहे… त्याची तब्येत सुधारली आहे… पण हीच नियतीची क्रूरता आहे की, एक उदयोन्मुख, सेवाभावी तरुण नेता कायमचा आपल्यातून निघून गेला.
केतनचा अचानक जाणं ही फक्त रत्नपारखी कुटुंबाची नाही, तर संपूर्ण दिग्रसच्या जनतेची अपार हानी आहे.
आई, नवविवाहित पत्नी, लहान बंधू सचिन, ताई, मित्रपरिवार – सर्वांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आजचा दिवस दिग्रससाठी काळा दिवस आहे.
दिग्रसने केवळ एक तरुण नेता गमावला नाही, तर एक माणूस गमावला आहे – जो शेकडोंच्या आयुष्यात आनंद घेऊन यायचा.
अत्यंत वेदनादायी, अंतःकरणाचा ठाव घेणारी ही दुर्दैवी घटना…
मन हेलावून टाकते.
भावपूर्ण श्रद्धांजली!
– डॉ. प्रदीप मेहता
No comments:
Post a Comment