दिग्रस (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) :
रक्तदान शिबिरात होणारे रक्तदान हे केवळ रक्त संकलन नसून जिल्ह्यातील सिकलसेल आणि थॅलेसेमिया ग्रस्त मुलांसाठी जीवनदायी अमृताचा ठेवाच असल्याचे प्रतिपादन शासकीय रक्तपेढी यवतमाळचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अभिजीत कपिले यांनी केले. अशा रक्तदान शिबिरातून संकलित केलेले रक्त अपघातग्रस्त रुग्ण, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला व रक्ताच्या कमतरतेने ग्रस्त बालकांसाठी जीवनदायी वरदान ठरत असल्याचे रक्तदान शिबिरात रक्तदात्त्यांशी संवाद साधतांना ते म्हणाले. ईद-ए-मिलादच्या पवित्र पर्वावर डॉ एपीजे अब्दुल कलाम फोरम दिग्रस द्वारा आयोजित रक्तदान शिबिर अतिशय उत्साहात पार पडले. समाजातील सर्व जाती धर्माच्या, सर्व स्तरातील तब्बल दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान करून या जीवनदायी, मानवतावादी व पवित्र कार्यात मोलाचा वाटा उचलला.
ईद-ए-मिलादच्या या मंगलदिनी डिजे वाजविण्यापेक्षा 'जीवन' वाचविण्याचा, सामाजिक सलोख्याचा, एकजुटीचा, मानवतेचा आणि जीवनदानाचा हा अतिशय उपयुक्त असा उपक्रम असल्याचे मत शिबिरास भेटी देणाऱ्या मान्यवरांनी व्यक्त केले. शिबिरात केवळ दोनशे युनिट्स रक्त जमा झाले नाही, तर दिग्रसकरांनी विविधतेत एकता आणि सामाजिक सलोख्याचा कृतीयुक्त संदेश दिल्याचा सूर भेटी देणाऱ्या मान्यवरांचा होता. रक्तदान शिबिरात रक्तदात्यांची रीघ लागली होती. रक्त संकलन पिशव्या संपल्या पण रक्तदाते कमी पडले नाहीत. या शिबिरात विद्यार्थी, शिक्षक, अभियंता, डॉक्टर, वकील, पोलिस, शासकीय कर्मचारी व अधिकारी, व्यापारी, पत्रकार, कामगार, मजूर, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी रक्तदान करून सर्वसमावेशकतेचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अभिजीत कपिले, समाजसेवा अधीक्षक आशिष दहापुते, अधिपरिचालक विजय कुऱ्हे व इतर कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय दिग्रसचे अधीक्षक डॉ. विरेंद्र अस्वार, डॉ संजय जाधव, गोदावरी मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे शाखा व्यवस्थापक राहुल कोल्हे पाटील, सफिया रहमान शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे मझहर खान आणि दिग्रस तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पी पी पप्पुवाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ कलाम फोरमचे मुख्य कार्यवाह मिर्जा अफजल बेग, अध्यक्ष फिरोज खान, सचिव आमीन चौहान, प्रकल्प प्रमुख फारुक अहेमद, कार्याध्यक्ष अमीन नौरंगाबादे, नासिर बेग, उपाध्यक्ष हाजी अजीम खान, कोषाध्यक्ष आसिफ शेख, प्रसिद्धी प्रमुख फैय्याज शेख, आतिक शेख, जावेद परसुवाले, रफिक शेख, फारुक चव्हाण, शोएब मलनस यांचेसह सर्व सदस्यांनी तसेच गोदावरी बँकेचे सुयोग महल्ले, हर्षल बदूकले, सलमान शेख, राहुल कटेकर, नयन पाटील, आफताब शेख, ओम ठाकरे, अमोल बोंडगे, निलेश बोरोकर, असलम शेख यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले.
चौकट :
महिलांचे पहिल्यांदाच रक्तदान!
शिबिराच्या पाच वर्षांच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच महिलांनी रक्तदान केले. अंजुम परवीन आणि मो. अतिक शेख तसेच मलेका सय्यद आणि राहील सय्यद या दांपत्याने यावेळी रक्तदान करुन आगळावेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला. तर तब्बसुम परवीन मुख्तार खान, सूफिया परसुवाले, रेश्मा आसिफ इसानी, गुलनाज शेख नाजीम, सुमैया परवीन सैय्यद इरफान या महिलांनी पहिल्यांदा रक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभाग नोंदवला. पोलिस उपनिरीक्षक राजेश लाखकर, विद्यानिकेतन शाळेचे प्राचार्य निवृत्ती ढोडरे, जिल्हा परिषद शाळा सावंगा येथील मुख्याध्यापक गुलाब तायडे, आरोग्य विभागाचे डॉ. कपिल मुनेश्वर, मराठा सेवा संघाचे दिलीप महिपाल, एस टी महामंडळाचे कर्मचारी चंदन देविदास आडे आणि होमराज जाधव, पत्रकार किशोर कदम, गोदावरी बँकेचे अमोल बोंडगे, क्रीडा शिक्षक आशिष अगलदरे, अनिल किसनराव नवघरे, किशोर अमरसिंग जाधव, रोहन नारायण जाधव, संजय रामराव मुन्नारवार, पुरुषोत्तम नारायण पंडितकर, विजय मधुकर अंबुरे, धीरज गोविंदराव ठाकरे यांनीही रक्तदान केले.
No comments:
Post a Comment