Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, November 1, 2025

कुंभारी तांड्यात वसंतराव नाईक अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी संघटनेतर्फे भव्य सत्कार सोहळा. गुणवंत विद्यार्थी, नव्याने सेवेत दाखल कर्मचारी व सेवानिवृत्त मान्यवरांचा सन्मान — समाजभानाचा अनोखा उपक्रम


कुंभारी तांडा (ता. पुसद, जि. यवतमाळ) (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
दिवाळीच्या सुट्यांचा आनंद साजरा करताना वसंतराव नाईक अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी संघटनेतर्फे कुंभारी (तांडा) येथे एक प्रेरणादायी व सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, नव्या शासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांचा आणि सेवापूर्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुंभारी तांड्याचे नायक श्री. सुधाकर राठोड यांनी भूषविले. तर प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेसराव राठोड यांनी केले.
प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. विष्णू चव्हाण (सहसचिव, अखिल भारतीय तांडा सुधार समिती) यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, एमपीएससी, पोलीस भरती, उच्च शिक्षण व सेवासंधी या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी नमूद केले की, “गावातील विद्यार्थ्यांकडे प्रतिभेची शिदोरी आहे; योग्य दिशा व आत्मविश्वास मिळाला, तर हे विद्यार्थी समाजाचे मार्गदर्शक बनू शकतात.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्ताराव पवार (विज्ञान शिक्षक, स्व. प्रकाशभाऊ उमाठे विद्यालय, नागपूर) यांनी प्रभावीपणे केले. गेल्या सात वर्षांपासून ‘बॅक टू सोसायटी’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम ते सातत्याने राबवत असून, त्यांचे सुक्ष्म नियोजन आणि सामाजिक जाणिवेमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
त्यामध्ये डॉ. तुषार पवार, डॉ. मधुकर जाधव, RFO नितीन जाधव, फायर ऑफिसर वसंत पवार, सहायक महसूल अधिकारी रमेश जाधव, तंत्र अधिकारी रोहिदास जाधव, तसेच शिक्षक के. एम. पवार, आर. टी. राठोड, इतर अधिकारी व समाजसेवकांचा समावेश होता.
सेवानिवृत्त पोलीस पाटील मारोतराव मस्के यांचे मार्गदर्शन लाभले.
कर्मचारी किशोर चव्हाण, अश्विन पवार, मधुकर राठोड (API), डॉ. संदीप पवार, अंकुश राठोड, संजय जाधव, तसेच पंकज, पंजाब, मंगेश पवार, कैलास पवार, शैलेष चव्हाण, अ‍ॅड. युवराज चव्हाण, आणि विद्यार्थी प्रतिनिधी राजेश राठोड, मयुरी राठोड, वैष्णवी पवार यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

या वर्षी एकूण ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात दोन विद्यार्थी एमबीबीएस, एक विद्यार्थी एमडी अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झाले असून, काहींनी इंजिनियरिंग, फार्मसी, मीडिया व व्हिडिओ एडिटिंग सारख्या क्षेत्रांत यश मिळवले आहे.
दहावी व बारावीमध्ये ७५% पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
तसेच दोन नव्याने सेवेत दाखल झालेले आणि दोन सेवानिवृत्त मान्यवर कर्मचारी यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी श्री. दत्ताराव पवार यांनी समाजातील अंतर्गत मतभेदांवर व विकासातील अडथळ्यांवर थेट भाष्य केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,

> “आपल्याच समाजातील काही प्रवृत्ती आपल्या प्रगतीला अडथळा ठरत आहेत. गावात आजही रस्ता, पाणी, वीज, शिक्षण अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. देश ७५ वर्षांनंतरही तांड्यातील नागरिक आरोग्य व शिक्षणाच्या प्राथमिक सोयींपासून वंचित आहेत — ही चिंतेची बाब आहे.”



त्यांनी आवाहन केले की,

> “आपला समाज बदलणार असेल, तर तो बाहेरच्यांच्या मदतीने नव्हे, तर आपल्या स्वतःच्या जागृतीने आणि एकतेनेच बदलू शकतो.”



या विचारांनी उपस्थितांना अंतर्मुख करून समाजात एकतेचा व प्रगतीचा दीप प्रज्वलित केला.
कार्यक्रमात महिला, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
गावातील शिस्त, एकात्मता व शिक्षणप्रेमाचा सुंदर संगम या सोहळ्यात दिसून आला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य ईश्वर जाधव यांनी केले.
एकूणच, वसंतराव नाईक अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी संघटनेचा हा उपक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक जागृती, प्रेरणा आणि प्रगतीचा दीपस्तंभ ठरला आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर