मानोरा (जि. वाशिम) : (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
तालुक्यातील मोजे गव्हा येथील गट क्रमांक १९ व २० मधील शेतजमिनीच्या वादाला नवे वळण लागले असून, नाल्याच्या रुंदीकरणामुळे जुना पांदण रस्ता गायब झाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पर्यायी मार्ग शिवाडीमधून देण्याऐवजी थेट शेतातून रस्ता काढण्याचा प्रयत्न होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
यापूर्वी दिनांक २७ मार्च २०२६ रोजी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देत या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की, नाल्याच्या काठाने जाणारा पारंपरिक पांदण रस्ता नाला रुंदीकरणाच्या कामात पूर्णपणे नष्ट करण्यात आला. या परिस्थितीत शिवाडीच्या बाजूने पर्यायी रस्ता देणे शक्य असताना तो न देता संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या खासगी शेतातून रस्ता देण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. यामुळे शेतजमिनीचे नुकसान होऊन शेतीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर दुर्गाबाई वसंतराव हेडा, संदीप वसंतराव हेडा आणि योगिता संदीप हेडा यांनी तहसील कार्यालय, मानोरा येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आंदोलन पूर्णपणे शांततामय मार्गाने सुरू असून स्थानिक नागरिकांनीही पाठिंबा दर्शविला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
शेतातून जबरदस्तीने रस्ता काढण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा
नष्ट झालेल्या पांदण रस्त्याच्या ऐवजी शिवाडीमधून पर्यायी रस्ता द्यावा
संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करावी
संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन न्याय दिला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment