मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) : मौजे गव्हा (ता. मानोरा) येथील गट क्रमांक १९ व २० मधील शेतजमिनीवरून निर्माण झालेला रस्त्याचा वाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तब्बल २५ वर्षांपासून कोणताही वाद नसताना 2025 मध्ये अचानक रस्त्याची मागणी पुढे आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व संताप निर्माण झाला आहे.
दुर्गाबाई हेडा, संदीप हेडा, योगिता हेडा व वसंतकुमार हेडा हे कुटुंबीय अनेक वर्षांपासून संबंधित जमिनीवर शेती करत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी कधीही रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. मात्र 2025 मध्ये अचानक तक्रार दाखल होत रस्त्याची मागणी पुढे आली आणि वादाला तोंड फुटले.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, प्रशासनाने घाईघाईत व एकतर्फी निर्णय घेतला. प्रत्यक्ष जागेची पाहणी न करता, शेतकऱ्यांची संमती न घेता तसेच पटवारी अहवाल व भूमिलेख नकाशाचा योग्य विचार न करता आदेश पारित करण्यात आला. काहींनी यामागे राजकीय दबाव असल्याचाही संशय व्यक्त केला आहे.
तसेच, उपविभागीय अधिकारी (कारंजा) यांनीही हा आदेश कायम ठेवल्याने शेतकऱ्यांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे. “अचानक 2025 मध्येच हा प्रश्न का निर्माण झाला, याची सखोल चौकशी व्हावी,” अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
न्याय मिळत नसल्याची भावना तीव्र झाल्यानंतर हेडा कुटुंबीयांनी आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देत नकाशे व कागदपत्रांची तपासणी केली आणि प्रकरणाचा योग्य पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर कुटुंबीयांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले.
मात्र, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील जमीनविषयक वाद, प्रशासनाची पारदर्शकता आणि निर्णय प्रक्रियेवरील विश्वास याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.
No comments:
Post a Comment