वाशिम, दि. १४ एप्रिल (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस):
महापुरुषांना खरे अभिवादन हे केवळ त्यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करण्यात नसून, त्यांच्या विचारांचे आचरण आपल्या दैनंदिन जीवनात करण्यामध्ये आहे. त्यांच्या शिकवणुकीनुसार स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणल्याशिवाय सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
सामाजिक सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त शरद चव्हाण, तसेच उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर उपस्थित होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश नरवाडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पुरस्कारप्राप्त मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त पीयूष चव्हाण यांनी सामाजिक समता सप्ताहांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये ई-टेस्टद्वारे प्रश्नमंजूषा, ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत पाच जणांना नियुक्ती आदेश, तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत आठ जणांना प्रतिनिधिक स्वरूपात जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते रमेश नरवाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय विचारांवर भाष्य करत “वन मॅन, वन वोट” या तत्त्वातून सामाजिक व आर्थिक समतेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच “प्रॉब्लेम ऑफ रुपी” या ग्रंथाचा संदर्भ देत चलनव्यवस्थेतील शिस्तबद्धतेवर त्यांनी प्रकाश टाकला.
उपायुक्त शरद चव्हाण यांनी राज्यघटनेतील कलम ४६ विषयी माहिती दिली. परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा यांनी “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या संदेशाचे महत्त्व स्पष्ट केले. उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देत उच्च ध्येय ठेवण्याचे आवाहन केले, तसेच मुलींच्या शिक्षणाबाबत समाजातील मानसिकतेत सकारात्मक बदल घडविण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ लिपीक हरीष वानखेडे यांनी केले, तर आभार समाज कल्याण निरीक्षक राहुल शिरभाते यांनी मानले.
या कार्यक्रमास समाज कल्याण विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment