दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस )शिक्षण हा केवळ ज्ञान देण्याचा नव्हे तर माणूस घडवण्याचा प्रवास असतो. या प्रवासात प्रेरणा, प्रोत्साहनाचं बळ मुलांना अधिकाधिक यश मिळविण्यासाठी प्रेरित करीत असतं. जिल्हा परिषद उर्दू शाळा कलगाव येथील प्राथमिक शिक्षक आमीन नवरंगाबादे यांनी प्रेरणेचं हे बळ मुलांच्या पाठीशी कायम ठेवलं आहे. अगदी मुलांनी शाळा सोडून पाच वर्षे झाली तरी!
आपल्या पहिल्या बॅचमध्ये इयत्ता पाचवीत शिकवलेली मुले यावर्षी दहावीत उत्तीर्ण झाली असून, त्यांच्या यशाचा खास गौरव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. गुणवंतांचा घरपोच गौरव करत नवरंगाबादे यांनी मुलांचं यश अक्षशः साजरं केलं.
प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांसमवेत अभिनंदन पत्र, हार, पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि झाड देऊन त्यांना गौरवण्यात आले. खंसा मरियम एजाजाजोद्दीन, इफ्रा माहीन मोहम्मद जावेद इकबाल, अंशीरा सना मोहम्मद तौफिक, राबिया तबस्सुम मोहम्मद हाफिज, मसीरा माहीन निजामुद्दीन, रुहूल अमीन अब्दुल मोबीन या मुलांचा गौरव केला. यावेळी जिल्हा परिषद उर्दू शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इमरान कुरेशी, माजी अध्यक्ष नासीर अहेमद, मोहम्मद इजाजुद्दीन, अलीमुद्दीन शेख, अख्तर कुरेशी,
मोहम्मद इरफान उर्फ बब्बू भाई, कारी निजामुद्दीन, मोहम्मद जावेद इकबाल, फारुक अहेमद, मुख्याध्यापक सुरैयाबी मोहम्मद फारूक, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद परसुवाले, डॉ कलाम फोरमचे आमीन चौहान, फारुक चव्हाण, असिफोद्दीन काजी गुणवंतांच्या घरपोच गौरवात सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनीही आपल्या लहानपणीच्या आठवणी शेअर करत आपल्या ‘आमीन सर’ यांचेकडून मिळालेल्या प्रेम, मार्गदर्शन आणि प्रेरणेचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आमीन नवरंगाबादे यांचे हे पाऊल सर्वत्र कौतुकाचा विषय झाला आहे.
चौकट : "विद्यार्थ्यांचं यश हेच शिक्षकाचं खऱ्या अर्थाने यश असतं. या सर्व मुलांनी बालवयात घेतलेलं शिक्षण आज इतक्या मोठ्या टप्प्यावर नेलं, हे पाहून समाधान वाटतं."
- आमीन नौरंगाबादे, शिक्षक जि. प. शाळा, कलगाव
No comments:
Post a Comment