Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, August 22, 2025

सेवापूर्ती सोहळ्यात समाजाला दिशा देणाऱ्या शिक्षकांचा गौरव राजू ढोके यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा थाटात संपन्न

दिग्रस (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) :
शिक्षक म्हणजे समाजाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ. शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे पवित्र कार्य ज्यांनी आयुष्यभर हाती घेतले, असे उच्च श्रेणी मुख्याध्यापक राजू ढोके यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात व हृदयस्पर्शी वातावरणात पार पडला.

३६ वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर ३१ जुलै रोजी ते डेहणी येथून सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दिग्रस येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे यांची मुख्य उपस्थिती लाभली. तर अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख होते. शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे डॉ. सुचिता पाटेकर, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, सेवानिवृत्त सहाय्यक गट विकास अधिकारी किशोर गोळे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शुभदा पाटील, केंद्रप्रमुख किरण बारशे, राजू ढोके आणि सौ. सुनीता ढोके मंचावर उपस्थित होते.

आपल्या प्रभावी मार्गदर्शनपर भाषणात हभप मधुकर महाराज खोडे म्हणाले की, “समाजाच्या तिरस्कारातूनच पुरस्काराची वाट सोपी होत असते. गुरु म्हणजे प्रकाश, अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शक्ती. गुरुने दिलेल्या धड्यातून विद्यार्थी घडतो आणि त्या विद्यार्थ्यातूनच समाजाची घडण होते. शिक्षणाची दिशा देणारा चांगला शिक्षक मुलांच्या आयुष्याची दशा संपवू शकतो. मुलं ही देशाची खरी संपत्ती असून त्यांना घडविण्याचे मोठे कार्य शिक्षक करतात. आज समाजाला दिशा देणाऱ्या शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे.” त्यांच्या या प्रभावी विचारांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांना प्रेरणादायी ऊर्जा दिली.

महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. अभियंता यश ढोके यांनी प्रास्ताविक केले. अजय तुंडलवार यांचेसह मंचावरील सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ संस्कृती ढोके यांनी सर्वांचे आभार मानले. मयुरी ढोके, राजू ढोले, श्रीरंग ढोके, श्रेयस फाले, श्रीकांत ढोके, हरिदास घोरपडे, प्रशांत  ढोके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. या सोहळ्याला परिसरातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, नातलग आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. संपूर्ण सोहळा हृदयस्पर्शी व भावनिक वातावरणात पार पडला. शेवटी राजू ढोके यांना दीर्घायुष्य व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली.

शिक्षकांचा गौरव! 

राजू ढोके यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्यात सेवापूर्ती निमित्त केवळ राजू ढोके यांचाच नव्हे तर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रा. डॉ. रविभूषण कदम, प्रफुल्ल निलावार, अमर जाधव, नितीन डहाके, अतुल मैंद या शिक्षकांचाही सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कृतज्ञतेसह प्रेरणा देणारा हा सोहळा ठरल्याने उपस्थित सर्वच प्रभावित झाले. उपस्थित मान्यवरांनी राजू ढोके यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहावं, अशी अपेक्षा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

फॉलोअर