दिग्रस ता.०२, (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसाने अरुणावती धरण जलपातळी १०० टक्के भरले असून धरणात पाण्याचा येवा सुरुच असल्याने मंगळवारी (ता.०२ सप्टेंबर) सकाळी धरणाचे सर्व ११ ही दरवाजे उघडण्यात आले आहेत.
सतत येणाऱ्या पावसाने धरणात पाण्याची पातळी वाढतच असून धरणात १०० टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.०२ सप्टेंबर) सकाळी ८.३० वाजता सर्वच ११ दरवाजे प्रत्येकी ५० सेंटीमीटर प्रमाणे उघडण्यात आले आहेत. धरणात पाणलोट क्षेत्रातून वेगाने पाण्याचा येवा सुरू असून धरणातून २० हजार १२६ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून पाणी सोडतांना अरुणावती पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने सावंगा ते चिरकुटा, लोणी, शिवणी, आरंभी या गावांचा संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणचे नाले हे दुथडी भरून वाहत होते.
-- चौकट --
दिग्रस व आर्णी तालुक्यातील धरणा शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा --
पाणी सोडण्याअगोदर दिग्रसचे तहसीलदार मयुर राऊत व आर्णी चे तहसीलदार वाहुरवाघ यांना माहिती दिली. संबंधित दोन्ही तहसीलदार यांनी अरुणावती धरणाचे पाणी सोडल्यानंतर अनेक ठिकाणी उद्भवणाऱ्या पुर परिस्थितीपासून नागरिकांचा बचाव व्हावा या उद्देशाने धरणाशेजारी असणाऱ्या दिग्रस व आर्णी तालुक्यातील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा ईशारा दिला आहे. जोपर्यंत धरणात पाण्याची आवक सुरू राहील तोपर्यंत धरणाचे दरवाजे कमी जास्त उघडे ठेवण्यात येणार असल्याची माहिती, अरुणावती पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता अखिल चव्हाण यांनी दिली.
No comments:
Post a Comment