मानोरा : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवाजीनगर येथे दिनांक 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर 2025 दरम्यान पंचायत समिती मानोरा अंतर्गत सर्व जिल्हा परिषद, अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांचे तीन दिवसीय तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण उत्साहात पार पडले.
या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी मानोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. अनिल पवार यांनी उपस्थित राहून शिक्षकांना मूल्यवर्धन उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. तालुकास्तरीय समन्वयक म्हणून श्री. धनराज मेहल्डे (विषय साधन व्यक्ती, पंचायत समिती मानोरा) यांनी समन्वयकाची भूमिका यशस्वीपणे निभावली. तसेच प्रशिक्षणादरम्यान (SRG) श्री. प्रवीण बेलखेडे व (TPC) श्री. रविंद्र राऊत यांनी मार्गदर्शन केले.
तालुकास्तरीय प्रशिक्षणामध्ये एकूण नऊ सुलभक (DRG) यांनी अध्यापन सत्रांचे आयोजन करून शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापन अनुभव दिला. मानोरा तालुक्यातील 11 केंद्रांमधून 33 टक्के प्रमाणे एकूण 188 शिक्षकांनी प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदविला.
शांतीलाल मुथा फाउंडेशन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 1 ली ते 8 वी साठी मूल्यवर्धन उपक्रमाची पुस्तके तयार करण्यात आली असून, या उपक्रमाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्यांची रुजवणूक करण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
दिनांक 8 ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील शिक्षकांचे मूल्यवर्धन 3.0 प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले. या उपक्रमाकरिता शिवाजीनगर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. सुधीर काळे यांनी विशेष सहकार्य केले.
No comments:
Post a Comment