Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, October 11, 2025

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि कडधान्य अभियानाचा शुभारंभ

वाशिम, दि. ११ ऑक्टोबर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि कडधान्य अभियान यांचा शुभारंभ राष्ट्रीय विज्ञान संकुल, पुसा (नवी दिल्ली) येथे संपन्न झाला.

हा कार्यक्रम देशभरातील प्रत्येक जिल्हा, तालुका मुख्यालय, ग्रामपंचायत, कृषी विज्ञान केंद्र, बाजार समिती, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आणि प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र अशा विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत थेट प्रक्षेपणाद्वारे आयोजित करण्यात आला होता.

शेती क्षेत्रासमोर उभ्या असलेल्या वातावरण बदल, कमी उत्पादकता, सिंचनाची मर्यादा, कर्जाची अपुरी उपलब्धता, साठवणूक सुविधांची कमतरता तसेच प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाच्या अडचणी यावर मात करून शाश्वत शेतीचा विकास साधण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत देशातील १०० कृषी आकांक्षीत जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.

या निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये विविध विभागांच्या कृषी व ग्रामीण विकासाशी निगडित योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत संबंधित खात्यांचे अधिकारी, प्रगतशील शेतकरी, शास्त्रज्ञ, संशोधक आणि बँक प्रतिनिधी यांचा समावेश असेल. या समितीमार्फत जिल्ह्याचा पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जाईल. योजनेचे सनियंत्रण व मूल्यमापन नीती आयोगामार्फत राष्ट्रीय स्तरावर करण्यात येईल.

कृषी पिकांची उत्पादकता वाढवताना जमीन व पाणी यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन होणे, पर्यावरण समतोल राखणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करून कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता साध्य करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे येथे पार पडला. या कार्यक्रमास आमदार बापूसाहेब पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक अशोक किरनळ्ळी,  अंकुश माने,  रफिक नाईकवडी,  विनयकुमार आवटे आणि सुनील बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात राज्यातील पुणे, सोलापूर, अहिल्यानगर तसेच इतर जिल्ह्यांतील एकूण ५६८ कृषी सखी, कृषी पुरस्कार विजेते शेतकरी, नैसर्गिक शेती करणारे प्रगतशील शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले. कार्यक्रमावेळी कृषिमंत्री  भरणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या कृषी विभागामार्फत सोडविण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी कृषी विभागाच्या वतीने सहा नैसर्गिक शेती करणाऱ्या प्रगतशील शेतकरी आणि कृषी सखी यांचा सन्मान करण्यात आला. वेबकास्ट प्रणालीद्वारे राज्यभरातील असंख्य शेतकऱ्यांनी या अभियान शुभारंभ कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment

फॉलोअर