वाशिम, दि.१२ नोव्हेंबर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) उच्च मूल्य पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण हेच आमचे ध्येय आहे. चिया पिकामुळे शाश्वत उत्पन्नाची नवी दिशा उपलब्ध होऊ शकते.चिया पिकाची शेती ही फक्त एक पर्याय नसून, आरोग्यदायी आणि नफ्याची शेती करण्याचा मार्ग आहे. योग्य तंत्रज्ञान व नियोजनाद्वारे शेतकरी नक्कीच प्रगती करू शकतात.असे प्रतिपादन आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी केले.
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण भवन, वाशिम येथे रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी चिया पिकावरील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे बोलत होत्या.
या कार्यक्रमात रिसोड तालुक्यातील चिया उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी चिया शेतीतील प्रत्यक्ष अनुभव, उत्पादनातील बदल, व विपणनातील नव्या संधींबाबत आपले विचार मांडले.
पुढे बोलतांना श्रीमती महाबळे यांनी चिया पिकाच्या शेती तंत्रज्ञान, लागवड पद्धती, सेंद्रिय शेती, प्रक्रिया व विपणनाच्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली. चिया पिकांपासून तयार होणाऱ्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांविषयी शेतकऱ्यांना प्रेरक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन मंडळ कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी केले. त्यांनी चिया लागवडीतील स्थानिक अनुभव, पाणी व्यवस्थापन आणि उत्पन्नवाढीसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला.
प्रशिक्षणादरम्यान काही शेतकऱ्यांनी चिया शेतीवरील कविता व गीतांच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त करून कार्यक्रमाचे वातावरण रंगतदार केले. हा प्रसंग प्रशिक्षणाचा विशेष आकर्षणबिंदू ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका कृषी अधिकारी, रिसोड व त्यांच्या संपूर्ण टीमने पुढाकार घेतला. त्यांच्या समन्वय आणि सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे पार पडला.
हा प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांमधील नवोन्मेष, उत्साह व सर्जनशीलतेचे प्रतीक ठरला. कृषी विभाग व आत्मा यांच्या या उपक्रमामुळे उच्च मूल्य पिकांच्या प्रसाराला चालना मिळून, शाश्वत शेतीसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, सर्व तालुक्यांसाठी अशा प्रकारचे एकदिवसीय चिया पीक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढविण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे.
No comments:
Post a Comment