यवतमाळ : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने दिनांक १० नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजून १५ मिनिटांनी दुःखद निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राठोड कुटुंबियांवर शोककळा पसरली असून राठोड कुटुंबियांचे नातेवाईक, आप्तपरिवार तसेच राठोड समर्थक आणि विविध सामाजिक-राजकीय क्षेत्रातून शोकसंदेश व्यक्त करण्यात येत आहेत.
मातोश्री प्रमिलादेवी या अत्यंत शांत, सुसंस्कृत आणि अध्यात्मिक प्रवृत्तीच्या होत्या. आपल्या कर्तृत्ववान पुत्राच्या सार्वजनिक कार्याचा अभिमान त्यांना होता. राठोड कुटुंबातील सर्व सामाजिक उपक्रम, धार्मिक सण-समारंभात त्यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण मानली जात होती. कुटुंबातील सर्वांना आपुलकीने जोडून ठेवणारी ही आधारवडाची सावली आता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
अंत्यविधी बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी
त्यांचा अंत्यविधी बुधवार, दिनांक १२ नोव्हेंबर रोजी शिवपुरी (पहूर इजारा), ता. कळंब येथे सकाळी १० वाजता पार पडणार आहे. या वेळी विविध पक्षीय नेते, अधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राठोड कुटुंबियांवर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगी अनेकांनी श्रद्धांजली वाहत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment