मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस):
शासनाच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (सेतू) मंजुरी प्रक्रियेत तहसील कार्यालयाकडून झालेल्या तांत्रिक चुकीमुळे एका सुशिक्षित बेरोजगार उमेदवारावर अन्याय होण्याची वेळ आली आहे. अर्जातील वास्तव पत्ता चुकीचा नोंदविल्याने येत्या ३० तारखेला होणाऱ्या मुलाखतीत अपात्र ठरण्याची भीती व्यक्त केली जात असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार दाद मागूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
मानोरा तालुक्यातील वसंतनगर (पोहरादेवी) येथील रहिवासी श्री. अनिकेत अनिल राठोड यांनी नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज क्रमांक १५३ सादर केला होता. अर्जात वास्तव निवासस्थान व प्रस्तावित केंद्राचे ठिकाण स्पष्टपणे ‘वसंतनगर’ असे नमूद असताना, मानोरा तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माहिती पाठवताना नजरचुकीने केवळ ‘पोहरादेवी’ अशी चुकीची नोंद पाठवली.
तहसीलदारांकडून चूक मान्य, तरीही दुरुस्ती रखडली
या गंभीर त्रुटीबाबत तहसीलदार, मानोरा यांनी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू विभागाला दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी पत्र पाठवून चूक मान्य केली असून, तातडीने दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे. मात्र, त्यानंतर उमेदवाराने १५ व १८ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदने दिली असतानाही संगणकीय प्रणालीत अद्याप कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही.
मुलाखतीवर टांगती तलवार
येत्या ३० तारखेला सेतू केंद्रासाठी मुलाखती होणार असून, वेळेत ही तांत्रिक चूक दुरुस्त न झाल्यास पात्र असूनही उमेदवाराला डावलले जाण्याची शक्यता आहे. एका साध्या प्रशासकीय दुरुस्तीसाठी उमेदवाराला वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
“एकीकडे शासन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण राबवत आहे, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय होत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
पीडित उमेदवाराची व्यथा
“माझ्या अर्जात पत्ता ‘वसंतनगर’ स्पष्ट असताना तहसील कार्यालयाने तो ‘पोहरादेवी’ असा पाठवला. तहसीलदारांनी चूक मान्य करून पत्र दिले, तरीही जिल्हाधिकारी कार्यालय दुरुस्ती करत नाही. ३० तारखेपूर्वी ही चूक सुधारली नाही, तर माझ्यावर मोठा अन्याय होईल.”
— अनिकेत अनिल राठोड, पीडित उमेदवार
दरम्यान, प्रशासन याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेते की आणखी एका पात्र उमेदवारावर अन्याय होतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment