Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, January 11, 2026

क्लस्टर स्तरावरील संसाधन केंद्राच्या सर्वसाधारण समिती सदस्यांसाठी नेतृत्व व व्यवस्थापन कौशल्यांचा कार्यशाळेत प्रभावी ‘बूस्टर डोस’


वाशिम,दि.११ जानेवारी (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)‌ 
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत क्लस्टर स्तरावरील संसाधन केंद्राच्या सर्वसाधारण समिती सदस्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने  दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत अनसिंग, कळंबा महाली, पोहरादेवी, उंबरडा बाजार, धानोरा व मंगरुळपीर येथील सीएमआरसी अंतर्गत कार्यरत  संसाधन गट सदस्य यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी केली.

ही कार्यशाळा हॉटेल दानिश, वाशिम येथे पार पडली. जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट सीएमआरसी सर्वसाधारण समिती सदस्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या, निर्णय प्रक्रिया व कार्यपद्धती याबाबत अधिक स्पष्टता देणे तसेच संस्थात्मक कार्यक्षमता वाढविणे हे होते.

प्रशिक्षण सत्रांमध्ये नेतृत्व विकास, संघटनात्मक व्यवस्थापन, समस्या सोडविण्याच्या कौशल्यांचा विकास, प्रभावी संवाद व निर्णयक्षमतेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण अधिक परिणामकारक व्हावे यासाठी कृतीआधारित उपक्रम, समूह चर्चा, अनुभव कथन तसेच पीपीटी (पॉवर पॉईंट सादरीकरण) च्या माध्यमातून विषय प्रभावीपणे मांडण्यात आला. त्यामुळे सहभागी सदस्यांमध्ये सकारात्मक संवाद व परस्पर शिकण्याची प्रक्रिया घडून आली.
या प्रशिक्षणासाठी त्रिशूला घ्यार (सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी), प्रांजली वासाके (प्रकल्प अधिकारी) आणि वैभव काळमेघ (सहाय्यक व्यवस्थापन अधिकारी) यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी सीएमआरसी समितीच्या कार्यपद्धती, आर्थिक शिस्त, योजनांची अंमलबजावणी आणि महिलांच्या स्वयंसहायता गटांच्या सक्षमीकरणात समितीची भूमिका यावर सखोल माहिती दिली. सहभागी सदस्यांनीही चर्चेत सक्रिय सहभाग घेत आपले अनुभव मांडले.

प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आपले कार्य अधिक आत्मविश्वासाने, पारदर्शकतेने व नियोजनबद्ध पद्धतीने करता येईल, अशी भावना अनेक सहभागी सदस्यांनी व्यक्त केली. या कार्यशाळेमुळे सीएमआरसी समितीचे काम अधिक गतिमान व परिणामकारक होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

या प्रशिक्षण कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संकेत महाजन (लेखाधिकारी) तसेच माविम जिल्हा टीम यांनी उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधत कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली. सदर कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील सीएमआरसी समिती सदस्यांचे नेतृत्व कौशल्य व कार्यक्षमता निश्चितच अधिक बळकट होणार असल्याचे चित्र दिसून आले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर