वाशिम, दि. २१ मार्च (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध महत्वपूर्ण योजनांची माहिती संबंधित घटकातील लाभार्थ्यांना व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने अनुसूचित जाती उपयोजना सन २०२४-२५ अंतर्गत तयार केलेल्या समता चित्ररथ व समता डिजीटल रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस आणि समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी आज दि.२१ मार्च रोजी प्रशासकीय इमारत परिसरात चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी यासिरोद्दिन काझी, समाज कल्याण कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक सारंग गावंडे, जिल्हा माहिती कार्यालयातील राजू जाधव, रुपेश सवाई, अनिल कुरकुटे व हर्षराज हाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
समता चित्ररथ व समता डिजीटल रथाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, अनुसूचित जातीच्या मुलां-मुलींसाठी निवासी शाळा, मार्जिन मनी योजना, शेळी गट वाटप योजना व कन्यादान योजना या योजनांवर आधारित ऑडिओ-व्हिडीओ दाखविण्यात येणार आहे. बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे वाटप, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, रमाई आवास योजना, मुलां-मुलींसाठी वसतीगृह येाजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजना आदी योजनांवर आधारीत माहिती दाखविण्यात येणार आहे.
समता चित्ररथ व समता डिजीटल रथ जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक गावात जाणार असल्यामुळे संबंधित घटकांच्या लाभार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
*******
No comments:
Post a Comment