Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, March 28, 2025

प्रा.डॉ.सुभाष राठोड यांची गोर बंजारा साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड. श्रीराम नवमी दरम्यान श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे होणार आयोजन

 मानोरा-- गोर बंजारा समाजाचे प्रमुख तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे दरवर्षी चैत्र महिन्यात मोठी यात्रा भरते. जगदंबा देवी, संत शिरोमणी सेवालाल महाराज, सती सामका माता, जेताभाया, हामुलाल महाराज, डॉ. संत रामराव महाराज, बामणलाल महाराज आदी देवी देवता, संत - महात्मा यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, नवस फेडण्यासाठी भारतभरातून गोर बंजारा बांधव लाखोंच्या संख्येने मोठ्या भक्तिभावाने पोहरादेवी येथे येत असतात.  
विशेषतः दक्षिणेतील सर्व राज्ये व महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांतून या उत्सवासाठी श्रीक्षेत्र पोहरादेवीत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या यात्रेचे औचित्य साधून गोर बंजारा समाजातील संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, साहित्यविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यावर्षी पोहरागड येथे संपन्न होणाऱ्या गोर बंजारा साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी पुणे येथील प्रा. डॉ . सुभाष राठोड यांची निवड करण्यात आली आहे.
 डॉ. सुभाष राठोड यांच्या नावाची अधिकृत घोषणा किसन राठोड यांच्या सहमतीने राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड यांनी केली आहे. 
*डॉ. सुभाष राठोड यांचा अल्प परिचय :*
     'लेखन हे केवळ विचारांचे प्रकटीकरण नसून, ते समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.' या तत्त्वावर विश्वास ठेवत डॉ. सुभाष राठोड यांनी साहित्य, शिक्षण, समाजशास्त्र आणि इतिहास या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. लेखक म्हणून त्यांची शैली सखोल विचारप्रधान, विश्लेषणात्मक आणि अभ्यासपूर्ण आहे. त्यांचे लेखन केवळ माहितीपर नसून, ते वाचकांना अंतर्मुख करणारे आणि समाजप्रबोधन करणारे आहे. तांड्यावर जन्मलेला एक छोरा, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची तरीही शिक्षणाची आस कधीच कमी होऊ दिली नाही. डॉ. सुभाष राठोड हे गोर बंजारा समाजातील श्रीकांत जिचकार आहेत. 
   डॉ. राठोड—एक सृजनशील लेखक, नवोन्मेषी , विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. शिक्षण, शैक्षणिक संशोधन, लेखन आणि अध्यापन क्षेत्रात  त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
 "दुर्दैवाशी दोन हात करणाऱ्या मनगटांना यश मिळतेच," या उक्तीप्रमाणे, डॉ. राठोड यांचा जीवनप्रवास संघर्षमय असला तरीही तो जिद्दीने भरलेला आहे. ११ नोव्हेंबर १९७७ रोजी जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगाव तांडा येथे एका सर्वसामान्य गोर-बंजारा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंबीय अल्पभूधारक शेतकरी घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्या शिक्षणाच्या वाटेवर अनेक अडथळे आले होते. 
"माणूस जन्माने गरीब असू शकतो, पण विचारांनी नाही," या तत्त्वाने प्रेरित होत त्यांनी शिक्षणाची गोडी टिकवली. विद्यार्थी दशेत त्यांना स्वतः काम करून शिकावे लागले नायगाव येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे उच्चशिक्षण पूर्ण केले आणि एम.ए. मराठी, एम.एस.डब्ल्यू., डी.एस.एम., एम.एड., एम.फिल., नेट, सेट आणि पीएच.डी. या पदव्या मिळवून ज्ञानाचा अभेद्य किल्ला उभा केला.
  "एक शिक्षक म्हणजे समाजाचा शिल्पकार असतो," हे लक्षात ठेवून डॉ. राठोड यांनी अध्यापनात नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. ते सध्या  आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या वसंतराव सखाराम सणस ज्युनिअर कॉलेज, वडगाव खुर्द, पुणे येथे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक आणि ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 
    डॉ. राठोड यांचे योगदान फक्त अध्यापनापुरते मर्यादित नाही, तर ते महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे येथे मराठी विषय अभ्यासमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे येथे मराठी विषय तज्ज्ञ म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. त्यांचे अनेक लेख महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शिक्षण संक्रमण मासिकातून प्रसिद्ध झाले आहेत. तसेच ते विविध लोकप्रिय दैनिकांमधून  स्तंभलेखक म्हणून सातत्याने वैचारिक, प्रासंगिक , विश्लेषणात्मक असे लेखन करीत असतात. त्यांच्या लेखणीचा प्रभाव एवढा आहे की त्यांनी लिहिलेली तीन पुस्तके प्राथमिक शिक्षक शिक्षण (डी.एल.एड.) अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहेत.
"शब्दांच्या सामर्थ्याने समाज घडतो," असे मानणाऱ्या डॉ. राठोड यांचे लेखनही विचारप्रवर्तक आणि समाजप्रबोधनपर आहे. अनेक दैनिक आणि विविध शैक्षणिक नियतकालिकांमध्ये त्यांचे अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध होत असतात. ते उत्कृष्ट ब्लॉगर सुद्धा असून त्यांचे ‘मराठी मायभूमी’, ‘शिक्षण कट्टा’ हे ब्लॉग शैक्षणिक आणि सामाजिक चिंतनाचे व्यासपीठ बनले आहेत.
"गुणांचे सोनें कुणी लपवू शकले नाही," या न्यायाने त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.  त्यांच्या संशोधन व समाजकार्याची दखल घेत ‘गोर बंजारा धर्मपीठ, संत शिरोमणी सेवालाल महाराज यात्रा महोत्सव, पोहरागड’ येथे होणाऱ्या गोर बंजारा साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
    "शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे," या तत्त्वज्ञानावर निष्ठा ठेवून त्यांनी गोर-बंजारा समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधनासाठी भरीव स्फुट लेखन केले आहे. 
त्यांची विचारधारा स्पष्ट आहे—"शिक्षणाशिवाय परिवर्तन अशक्य आहे!" म्हणूनच ते विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक, समाजासाठी अभ्यासू विचारवंत आणि शिक्षणक्षेत्रासाठी नवोन्मेषी प्रयोगशील शिक्षक ठरले आहेत.
"रस्ता कितीही खडतर असला तरी प्रयत्नातील सातत्याने यश मिळतेच, जेव्हा ध्येय डोळ्यासमोर स्पष्ट असते!"
डॉ. सुभाष राठोड यांचा प्रवास संघर्ष, जिद्द आणि कठोर परिश्रमाचा आहे. 
"ज्ञान हेच खरं संपत्ती आहे!" या विश्वासाने ते विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर जीवन जगण्याची कला शिकवतात. त्यांच्या कार्याचा प्रभाव पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
"समाज परिवर्तनासाठी ज्ञानाच्या दीपस्तंभाची गरज असते, शब्द, विचार आणि कृती यांच्या त्रिसूत्रीनेच विकास घडतो असे मानणाऱ्यापैकी डॉ. सुभाष राठोड हे आहेत.
संत शिरोमणी सेवालाल महाराज यात्रा महोत्सव, पोहरागड’ येथे दि. ५ एप्रिल रोजी होणाऱ्या गोर बंजारा साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
   गोर बंजारा धर्मपीठ यात्रा महोत्सव २०२५ मध्ये राष्ट्रीय गोर बंजारा साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल प्रा. डॉ. सुभाष राठोड यांनी किसनभाऊ राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड व राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची असून, प्रेरणा व मार्गदर्शनाच्या आधारावर मी ती निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करेन असे ऊद्गार डॉ. सुभाष राठोड यांनी काढले.

फोटो--

No comments:

Post a Comment

फॉलोअर