वाशिम, दि.२२ मार्च (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) उत्तम पुस्तकांचे वाचन करणे यासारखी उच्च व प्रेरक शक्ती दुसरी कोणती नाही. समाजातील जिवंतपणा ग्रंथालयांसारख्या संस्थांमुळे टिकून राहतो. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दरवर्षी आयोजित ग्रंथोत्सवामुळे ग्रंथालय चळवळीला उत्तेजना मिळते, असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पांडे यांनी काढले. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनाच्या वतीने आयोजित वाशीम ग्रंथोत्सव २०२४ च्या समारोप कार्यक्रमात ते शुक्रवारी दि. २१ रोजी बोलत होते.
प्राचार्य डॉ. विजय पांडे समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक प्राचार्य अरूणराव सरनाईक, विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. गजानन वाघ, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह प्रभाकर घुगे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी संभाजी कातकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चांगली वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथोत्सवाचे महत्त्व विशेष आहे, असे मत प्राचार्य अरूणराव सरनाईक यांनी व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी समारोपीय कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमांचा आढावा घेत जिल्हा ग्रंथालयाची वाचन चळवळीतील भूमिका विशद केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाशीमसह कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील ग्रंथालयांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ग्रंथालय संघाचे जिल्हा कार्यवाह प्रभाकर घुगे यांनी सूत्रसंचलन केले. लिपिक नवल कव्हळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद
ग्रंथोत्सवाचा दुसरा दिवस विविध कार्यक्रमांनी गाजला. सकाळच्या सत्रात विनोदी कथालेखक अशोक मानकर, राजेश ठवकर, ग्रामीण कथालेखक आर.आर.पठाण आणि स्त्रीवादी लेखिका प्रा. सुनिता अवचार-दारोकार यांच्या कथाकथनाला उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यानंतर परिसंवादामध्ये लेखक डॉ. विजय जाधव, कृषी अधिकारी अभिजित देवगीरकर, प्राचार्य भास्कर गायकवाड, प्राचार्य हर्षा पसारकर, अॅड. उदय सोनोने यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. दिव्यांग बांधवांचा चेतन सेवांकूर ऑर्केस्ट्रा दुसर्या दिवसाचे विशेष आकर्षण ठरला.
तहसीलदारांच्या ग्रंथप्रेमाची चर्चा
तहसीलदार नीलेश पळसकर, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक श्री. प्रवीण कुंजीर यांनी अचानक ग्रंथोत्सवातील ग्रंथदालनाला भेट देऊन पुस्तक खरेदी केली. त्यांच्या वाचनप्रेमाची उपस्थितांमध्ये विशेष चर्चा होती. चेतन सेवांकूर हा दिव्यांग बालकांचा ऑर्केस्ट्रा काही काळ ऐकून त्यांनी कलावंतांना बक्षीसेही दिली. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कातकडे यांनी उभय अधिकार्यांचा ह्रद्य सत्कार केला.
No comments:
Post a Comment