वाशिम : दिनांक 19 मार्च ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नटवर्क )शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाच्या थेट विक्रीसाठी आणि बाजारपेठेच्या नवीन संधींसाठी जिल्हास्तरीय शेतमाल विक्री महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले. ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या महोत्सवाचे आयोजन २२ आणि २३ मार्च २०२५ रोजी स्व. बाळासाहेब ठाकरेशेतकरी प्रशिक्षण केंद्र, काटा रोड, वाशिम येथे सकाळी ९.०० ते रात्री ९.०० या वेळेत करण्यात आले आहे. १५० स्टॉल्स उभारले जाणार असून, धान्य, फळे, भाजीपाला, सेंद्रिय उत्पादने, कृषी प्रक्रिया उत्पादने आणि खाद्यपदार्थ थेट ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध असतील.
चियाच्या उत्पादनात वाशिम देशात आघाडीवर
वाशिम जिल्ह्यात ३,६०० हेक्टर जमिनीवर चियाची लागवड करण्यात आली असून, भारतातील सर्वाधिक क्षेत्रावर चियाची लागवड असलेला जिल्हा वाशिम ठरला आहे. कर्नाटकमध्ये प्रथमच चियाची लागवड सुरू झाली होती, मात्र केवळ दोन वर्षांत वाशिम जिल्ह्यात कर्नाटक राज्यापेक्षाही जास्त क्षेत्रावर चियाची लागवड झाली आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी सांगितले.
२२ मार्च रोजी चिया खरेदीदार-विक्रेता संमेलन (बायर-सेलर मीटिंग) आयोजित करण्यात आले असून, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या चिया खरेदीसाठी येथे उपस्थित राहणार आहेत. २३ मार्च रोजी इतर शेतमालांसाठी खरेदीदार-विक्रेता संमेलन होणार आहे.
या महोत्सवात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, 'वाशीम शेती शिल्प' या ब्रँडअंतर्गत ऑरगॅनिक आणि इतर शेती उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी शेतकरी आणि ग्राहकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनीही सर्व नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे सांगितले.
वाशिम जिल्हा देशातील चिया उत्पादनात आघाडीवर – ३,६०० हेक्टर क्षेत्रावर लागवड
No comments:
Post a Comment