Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, March 19, 2025

*वाशिममध्ये जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा* संपन्नउष्णतेच्या लाटेपासून बचाव व आपत्ती व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन


वाशिम,दि. १९ मार्च (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन समिती सभागृहात एक दिवसीय जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत उष्णतेच्या लाटेपासून बचाव, आपत्तीपूर्व तयारी, आपत्ती काळातील कार्यवाही आणि आपत्ती नंतरच्या उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक लता फड होत्या. आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या की, "आपत्ती ही कधीही सांगून येत नाही, त्यामुळे नागरिकांनी नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. अनेक अपत्ती या मानवी चुकीमुळे घडतात, विशेषतः रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर, वेगावर नियंत्रण आणि मद्यपान टाळल्यास अपघातांचे प्रमाण ८० टक्क्यांनी घटू शकते."

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी आवश्यक उपाय

जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग राठोड यांनी उन्हाळ्यात होणाऱ्या उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शक्यतो उन्हात जाणे टाळावे.
पुरेसे पाणी प्यावे आणि स्वतःकडे पाण्याची बाटली ठेवावी.
अंगभर सुती आणि हलके कपडे परिधान करावेत.
डोकं आणि चेहरा कपड्याने झाकावा, उन्हात फिरताना टोपीखाली ओले कपडे ठेवावेत.
उष्णतेचा तडाका बसलेल्या व्यक्तीस सावलीत ठेवून त्याला हळूहळू पाणी द्यावे आणि तातडीने १०८ क्रमांकावर संपर्क साधावा.
आपत्ती व्यवस्थापन व शोध-बचाव कार्याचे प्रात्यक्षिक
मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रशिक्षक दीपक सदाफळे यांनी आपत्तीच्या वेळी घ्यावयाच्या उपाययोजना व शोध-बचाव कार्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी पूर, आगीच्या घटना, रस्ते अपघात, भूस्खलन, विजेचा धक्का आणि सर्पदंश या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच, बचाव साहित्याची ओळख करून त्याचा योग्य वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
सर्पांविषयी समज-गैरसमज दूर करण्यावर भर
प्राध्यापक व सर्पसंरक्षक राजा गोरे यांनी सापांविषयी रोचक माहिती देत जनसामान्यातील गैरसमज दूर करण्यावर भर दिला. ते म्हणाले, "साप मनुष्यावर हल्ला करत नाहीत, परंतु भीतीमुळे लोक चुकीच्या गोष्टी करतात. सर्पदंश झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे."
हवामान व जैवविविधतेच्या निरीक्षणाचे महत्त्व
भारतीय मोसम विभाग, नागपूरचे संचालक डॉ. रिजवान यांनी नैसर्गिक आपत्ती ओळखण्यासाठी हवामान व जैवविविधतेचे निरीक्षण कसे महत्त्वाचे ठरते, यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "निसर्गातील छोटे बदल आणि प्राण्यांच्या वर्तनातील बदल हे भविष्यातील संभाव्य आपत्तीसाठी इशारा देऊ शकतात. त्यामुळे हवामान खात्याच्या सूचना गांभीर्याने घेणे गरजेचे आहे."
अनेक क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब दराडे, वीरेंद्र जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन  काझी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक अधिकारी शाहू भगत यांच्यासह पोलीस, आरोग्य विभाग, अग्निशमन दलाचे कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही कार्यशाळा आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरली असून, उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्ती काळात सतर्क राहण्याचे आणि योग्य उपाययोजना करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर