एखादा सूर्य जन्म घेतो आणि त्याच्या किरणांनी एकट्या आकाशालाच नव्हे, तर जमिनीवरचे अंधाराचे कपाटसुद्धा उजळून टाकले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असेच एक क्रांति सूर्य होते – ज्यांनी जन्मदात्या भूमीला केवळ प्रकाश दिला नाही, तर तिला आत्मभान, अधिकार आणि अभिमानही दिला.
महूच्या छावणीत एका सैनिकाच्या घरी जन्मलेले भीमराव, लहान असतानाच जगाच्या रुखरुखीत स्पर्शाला ओळखून गेले. पाटावर बसण्यास मनाई, पाण्याच्या घागरीवर आपले नाव नसल्यानं तहानलेल्या ओठांना ओल न मिळणं – ही त्यांच्या आयुष्याची अग्नीपरिक्षा होती. पण ज्या आगीत इतर जळतात, त्याच आगीत भीमराव सोनं होत गेले.
अंधाऱ्या झोपडीत अभ्यास करणारे तेच भीमराव एके दिवशी कोलंबियात पोहोचले. अमेरिकेच्या विद्यापीठात ‘डॉक्टर आंबेडकर’ नावाने गौरवला गेले. त्याची बौद्धिक चटक इतकी तीव्र होती की अर्थशास्त्र, कायदा, राजकारण, धर्म, समाजशास्त्र – हे सगळे त्याच्या विचारांच्या समोर नतमस्तक झाले.
*पाण्याच्या तळ्यापासून संविधानाच्या सिंहासनापर्यंत*:
महाडच्या चवदार तळ्यापाशी त्यांनी पाण्यासाठी फक्त घोट नाही, तर हजारोंच्या आत्मसन्मानाचा महापूर उभा केला. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या दरवाज्यावर केवळ आरतीचा नव्हे, तर समानतेच्या हक्काचा ध्यास होता.
त्या संघर्षातूनच एका दिवशी भीमराव, भारताच्या संविधानाच्या शिल्पकारपदी पोहोचले. ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय’ या चार शब्दांना संविधानाच्या पानांत त्यांनी ज्या श्रद्धेने रेखाटले, त्यात संपूर्ण मानवतेचा श्वास दडलेला आहे.
बुद्धाची करुणा स्वीकारत लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि एक नव्या भारताचा प्रारंभ केला. त्यांचे धर्मांतर हे आत्ममुक्तीचा जयघोष होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव केवळ एखाद्या व्यक्तीपुरतं मर्यादित नाही, ते एक युग आहे. त्यांच्या विचारात ज्या झंझावाताची ताकद होती, त्याने अनेकांनी आपल्या आयुष्याची दिशा बदलली.
आज जर एखादा गरीब मुलगा पायात चप्पल घालून अभिमानाने शाळेत जात असेल, एखादी वंचित समाजातील मुलगी निर्भीडपणे मंचावर आपले मत मांडत असेल, किंवा एखादा शोषित व्यक्ती डोळ्यात आत्मविश्वास घेऊन ‘मी माणूस आहे’ असे जगाला सांगत असेल – तर समजून घ्या, त्याच्या पाठीशी बाबासाहेबांचे विचार, त्यांचे बलिदान, आणि समतेची सावली उभी आहे.
बाबासाहेब आजही आहेत पुस्तकांच्या पानांत, संविधानाच्या शपथांत, शाळेच्या वर्गांत, संघर्षाच्या मैदानांत – आणि प्रत्येक माणसाच्या आत्मसन्मानात.
त्यांचे विचार म्हणजे आशेचा वटवृक्ष आहे – जो अन्यायाच्या तप्त उन्हातही सावली देतो.
ज्यांनी स्वतः जळून अंधारात वाट दाखवली, ज्यांनी आपल्या बुद्धीचा दीप प्रज्वलित करून समतेचा मार्ग उजळवला – त्या सूर्यस्वरूप बाबासाहेबांना आज आणि सदैव मनःपूर्वक वंदन !"
_अनिल कुरकुटे,
वाशिम ९५५२२७९२२७
No comments:
Post a Comment