Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, April 29, 2025

खते व बियाण्यांचा सक्तीने पुरवठा केल्यास कारवाई – जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचा इशारा कृषि निविष्ठा सनियंत्रण समिती सभा संपन्न

         वाशिम, दि. २९ एप्रिल (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस) : जिल्हयात येत्या खरीप हंगामात खताची कमतरता जाणवणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी. कृषी केंद्रांनी कोणत्याही कंपनीच्या खतांची साठेबाजी करु नये. जबरदस्तीने खतांसोबत शेतकऱ्यांना अन्य वस्तू घेण्याचा आग्रह कंपनीने कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यांना करु नये. खतांचे दर कमी झाले असल्यास कमी झालेल्या दरानेच खतांची विक्री कृषी केंद्रांनी करावी. शेतकऱ्यांची विक्री दराबाबत फसवणूक करु नये. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांना कृषी निविष्ठा  कंपन्यांनी आवश्यकता पेक्षा जास्त खते व बियाणे, खते बळजबरीने पुरविल्यास संबंधितांवर रीतसर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.कृषी केंद्रांना देण्यात येणाऱ्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे अन्यथा पालन न करणाऱ्या कृषी केंद्रावरही कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी सांगितले.

           दि.२८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची  आढावा बैठक श्रीमती बुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. सभेला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ पाहा,  जिल्हा परिषदेचे  कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगीरकर, खत उत्पादक कंपनी इफको, आर सी एफ, बसंत ॲग्रोटेक, महाराष्ट्र कृषी  उद्योग महामंडळ यांचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी आणि तालुका निविष्ठा संघांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
      जिल्हाधिकारी म्हणाल्या की, जिल्ह्यात शेतकरी उत्पादक संस्थाची संख्या वाढवण्यावर भर द्यावा. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा चांगला भाव मिळण्यास मदत होईल. त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
    यावेळी जिल्हाधिकारी यांनी कृषी सेवा केंद्रांच्या मालकांना आवाहन करत सांगितले की, जिल्हा प्रशासन येत्या दोन महिन्यात दहा लाख जलतारा शोषखड्डे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला जलतारा शोषखड्डे निर्माण करण्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
          श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, कंपन्यांनी आपल्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी. कृषी केंद्रांनी एका विशिष्ट कंपनीची उत्पादीत निविष्ठा खरेदी करण्याबाबत शेतकऱ्यांना आग्रह करु नये. शेतकऱ्यांना माती परिक्षण करण्यास कृषी विभागाने प्रोत्साहीत करावे. जमिनीमध्ये सल्फरचे प्रमाण कमी असल्यास सल्फरचा वापर करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना द्यावा. शेतकऱ्यांनी बियाण्यांची बॅग फोडल्यानंतर त्यातील बियाणे योग्य प्रकारचे नाही असे वाटत असेल तर ते बियाणे विक्रेत्याने परत घ्यावे. असे त्यांनी सांगितले.  
         श्री. आरीफ शाहा म्हणाले, ज्या कंपनीचे बियाणे कृषी केंद्राकडे  येईल, त्या विक्रेत्याने त्या बियाण्यांची उगवण क्षमतेची खात्री करुन बियाण्यांची विक्री करावी.कृषी निविष्ठांच्या तपासणीसाठी भरारी पथके व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
          सन 2024-25 या वर्षात 4 लक्ष 5 हजार  360 हेक्टर सरासरी क्षेत्रावर  पेरणी प्रस्तावित होती. तर प्रत्यक्षात  3लक्ष 97 हजार 896 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.सन 2025-26 या वर्षात 4लक्ष 1 हजार क्षेत्रावर लागवड प्रस्तावित आहे. खरीप हंगामात 2 लक्ष 36 हजार 37 क्विंटल बियाण्याची लागणार आहे.
         सभेत निविष्ठा पुरवठा व दर्जाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी व त्याचे निवारण करणे निविष्ठांच्या किंमती नियंत्रणाबाबत, जिल्हयातील शेतकऱ्यांना योग्य निविष्ठांचा योग्य वेळी पुरवठा करणे, बाहेर राज्यातून अवैधरित्या अनधिकृत बियाण्यांचा जिल्हयात पुरवठा व विक्री होणार नाही या याविषयासह गुण नियंत्रणासाठी गठीत केलेल्या पथकाचे काम परिणामकारक होण्यासाठी पोलीस व महसूल यंत्रणा तसेच अन्य यंत्रणांशी समन्वय साधण्याविषयी चर्चा करण्यात आली.

******

No comments:

Post a Comment

फॉलोअर