Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, May 2, 2025

गावकऱ्यांच्या तहानेसाठी सोडले पिकावर पाणी,सेवानिवृत्त शिक्षकाची अशीही दर्यादिली!


दिग्रस : पाण्याविना गावाची कल्पनाही करणे केवळ अशक्य आहे. पाणी हे मानवाचं जीवन तसंच ते गावाचंही! पण दुदैवाने अजूनही गावांच्या, शहरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटलेला नाही. उलट ही तहान वर्षोगणती वाढतच आहे. दिग्रस शहरात आणि तालुक्यातही यावर्षी भयंकर पाणी टंचाई जाणवत आहे. पाणी टंचाईच्या झळा जसंजसे ऊन वाढत आहे तसतशा अधिक तीव्र होत आहे. एप्रिल महिन्यातच तहानेने गावं, वाड्या, वस्त्या व्याकुळ झाल्या आहेत. ही तहान भागवण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरलं असलं तरी गावातील काही दानशूर, कर्तव्यनिष्ठ माणसं आपल्या विहिरी गावासाठी खुल्या करून लोकांना पाणी पाजत आहे. मानवतेचा हा ओलावा एवढ्या प्रचंड उन्हातही सुखद धक्का देणारा आहे. 

दिग्रस तालुक्यातील डेहणी हे गाव सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. उशाला असलेलं धरण, गावात असणारी कोट्यावधींची योजना, तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत आपली तहान भागवू शकत नसल्याचा तीव्र संताप गावकरी व्यक्त करत आहेत. येथील पाणी पुरवठा योजनेवर तब्बल सव्वा कोटी रुपयांचा निधी खर्ची पडला मात्र योजनेतून सव्वा लिटर पाणी गावाला मिळाले नाही. गावकऱ्यांच्या हा संताप, राग आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाने आपली विहीर लोकांसाठी 24 तास खुली करून दिली आहे. त्याला मानवतेची, माणुसकीची आणि आपुलकीची किनार आहे. आपली विहीर अधिग्रहित न करता, पाण्याचा कोणताही मोबदला आपल्याला नको अशी अतिशय मानवीय भूमिका त्यांनी घेतली. विहिरीसोबतच स्वतःचा मोटार पंप, पाईप आणि वीज उपलब्ध करून दिली आहे. हे करतांनाच आपली उन्हाळी पिके त्यांना गुंडाळून ठेवावी लागली. तसे दरवर्षी ते उन्हाळी भुईमूग घेतात. यावर्षी केलेल्या नियोजनानुसार ते भेंडी, बरबटी, वांगी ही पिके घेणार होते. मात्र गावातील भीषण टंचाई पाहून त्यांचं मन वितळलं. गावाची तहान भागविण्यासाठी त्यांनी पिके घेण्याचे थांबवून सरळ विहिरीतील पाणी ग्राम पंचायत विहिरीत सोडले. आणि गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले. दिवाकर इहरे यांची डेहणी गावालगतच वडिलोपार्जित साडे तीन एकर शेती आहे. गरजेच्या वेळी चार घोट पाणी विनासायास लोकांच्या कामी पडलं यापेक्षा मोठा मोबदला तो काय असणार? असा उलट प्रश्न ते आपल्याला करतात. गावच्या सरपंच सपना राठोड, सामाजिक कार्यकर्ते बबलू राठोड, ग्राम विकास अधिकारी गुलाब चतुर आणि काही गावकऱ्यांच्या विनंती वरून आपण विहीर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही त्यांनी पाणीटंचाईसाठी विहीर उपलब्ध करून दिल्याचे गावकरी कृतज्ञतापूर्वक सांगतात. 

चौकट : 
सेवानिवृत्तीनंतरही सेवा देणारे शिक्षक!
दिवाकर इहरे यांनी दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरसूल, कलगाव आणि तुपटाकळी शाळेत 32 वर्षे सेवा दिली आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि टिप म्हणून इहरे सर आजही ओळखले जातात. इंग्रजी विषयाचा दांडगा अभ्यास, मुलांना समजेल अशा पद्धतीने अध्यापन, गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य करणे, अतिरिक्त वर्ग घेऊन मुलांच्या इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करून घेणे असे अनेक उपक्रम ते राबवत असत. ते डिसेंबर 2018 मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी मार्च 2019 पर्यंत तब्बल तीन महिने दररोज नियमित शिक्षकाप्रमाणे  शैक्षणिक कार्य करून सेवानिवृत्तीनंतरही सेवा दिली.
त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ ही अतिशय भव्यदिव्य असा झाला होता, हे विशेष!

No comments:

Post a Comment

फॉलोअर