चिखली, दि. 28 मे (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
चिखली येथील धरणाच्या कॅनॉलमध्ये वारंवार होणाऱ्या फुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे.
दि. 27 मे रोजी सायंकाळी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे चिखली येथील धरणाच्या कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले आणि कॅनॉल फुटल्यामुळे परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.
या दुर्घटनेत गजानन यशवंतराव देशमुख यांचे संत्रा पीक पूर्णतः वाहून गेले असून, मोहनराव देशमुख यांच्या शेताचेही प्रचंड नुकसान झाले आहे. संबंधित कॅनॉल वारंवार फुटतो असून याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा सिंचन विभागाकडे निवेदने दिली आहेत. मात्र आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे चिखली धरणाच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही. भविष्यात पुन्हा पाऊस झाल्यास कॅनॉलमधील पाणी थेट शेतात घुसणार असून नुकसानाचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद देशमुख यांनी यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय राव देशमुख यांना निवेदन दिले आहे. फुटलेले कॅनॉल तात्काळ दुरुस्त न केल्यास रयत क्रांती संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या जीवित आणि पिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतूनही होत आहे.
No comments:
Post a Comment