Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, June 30, 2025

शेतकरी सुखी तर देश सुखी...! "घनघोर अंधेरा छाया देरी क्यू प्रभात मे...नाईक साहाब जैसा लाल ना होगा भारत के इतिहास मे...भारत के इतिहास मे...""बळीराजा तू घेऊ नको फाशी, जग राहील तुझ्या विना उपाशी "


ब्रिटिश काळापासून सुरू झालेले शेतकऱ्यांचे शोषण स्वातंत्र्यानंतर थांबेल व कृषी क्षेत्राला सोनेरी दिवस येतील या भाबड्या आशेवर भारतीय शेतकरी आजही जगत आहे पण शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांच्या या आशेवर पाणी फिरल्याने तो आत्महत्या सारखे चुकीचे पाऊल उचलत आहे भारतासारख्या कृषी प्रधान देशात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या चे वाढते आकडे ही देशाच्या भविष्यासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे आत्महत्या रोखण्यासाठी शासन विविध विकास योजनांचा माध्यमातून प्रयत्न करत आहे पण या योजना शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कितपत प्रभावी ठरल्या आहेत, यात मात्र शंकाच आहे. ज्या शेती व्यवसायावर इतर सारा विकास अवलंबून आहे, जो शेतकरी शेतात राबतो. तो शेतकरी राजा स्वतःच्या जीवाचा, कुटुंबाचा विचार न करता टोकाचा निर्णय कसा घेऊ शकतो? स्वतःला  संपवताना त्याला परत एकदा विचार करावासा का वाटत नाही? शेती प्रश्नाकडे सरकारचे आज तितकेसे लक्ष नसल्याने शेतकरी हाताश झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकारने गंभीरपणे उपाययोजना करायला हव्यात.
शेतकरी सद्यस्थितीत आत्महत्या सारखं चुकीच पाऊल उचलत असताना, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. माझी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची यांच्या शेतीविषयक विचारांचा वसा आणि वारसा स्वीकारून यावर कठोर अंमलबजावणी करण्याची खरी गरज आहे. अशावेळी मा.वसंतरावजी नाईक यांच्यासारखी संवेदनशील ता आपल्या राज्यकर्त्या मंडळींमध्ये नाही का, अशा प्रकारचा प्रश्न पडतो. ‘शेती मोडली तर लोकशाही मोडेल’ असे स्पष्ट विचार मांडत त्यांनी केंद्रातील मंत्र्यांची नाराजी ची कधीही तमा बाळगली नाही मग शेतकऱ्यांची काळी ज्वारी खरेदी असो व एकाधिकार कापूस खरेदी योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी धोरणात्मक निर्णय राबविले. हरितक्रांतीचे उद्गाते ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर एम. एस. स्वामीनाथन वसंतराव नाईक बद्दल म्हणतात-" माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी त्या काळात “जय जवान जय किसान” हा नारा देऊन देशात कृषी क्रांतीची ज्योत पेटवली होती, वसंतराव नाईक यांनी ती ज्योत  सतत तेवत ठेवण्याचे काम केले ". वसंतराव नाईक हे हाडाचे शेतकरी होते. शेती प्रश्नाबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांना चांगलीच जाण होती. कोरडवाहू शेतीतून उत्पादन मिळू शकत नाही हे ते जाणत होते म्हणून त्यांनी बांध-बंधारे,तलाव, लहान मोठी अनेक धरणे त्यांनी आपल्या राजवटीत बांधली व शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली. संपूर्ण महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम त्यांनी केला. आपल्या शेतीत विविधांगी प्रयोग त्यांनी केले. 
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले. त्यांची कृषी औद्योगिक क्षेत्रातील मोलाची कामगिरी वाखण्याजोगी आहे. आपल्या कारकिर्दीत कित्येक शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून एक जुलै हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ तत्कालीन सरकारने घेतला तेव्हापासून १ जुलै हा दिन कृषी दिन म्हणून शासकीय कार्यालय साजरा केला जातो. खरंतर १९७२ च्या दुष्काळात सगळी जनता होरपळून निघाली होती. लोकांना एक वेळ अन्नाची प्रांत झाली होती रोजगार नव्हता, पैसा नव्हता... अशा विदारक, महाभयंकर  परिस्थितीत नाईक साहेबांच्या अंगभूत असलेल बुद्धी कौशल्य, समाजभान, विज्ञानवादी दृष्टीकोन, धीरोदत्तपणा, परिपाक विचार, तत्त्वनिष्ठ आचार, शेती विषयी असलेली जाण व दूरदृष्टीमुळे एकही भूकबळी होऊ दिला नाही व महाराष्ट्रातील जनजीवन पुन्हा स्थिर सावर करण्यामध्ये नाईक साहेबांच्या कणखर नैतृत्वाचा सिंहाचा वाटा होता आज महाराष्ट्राच्या शेती व्यवस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यास नाईक साहेबांची विचारसरणीच कारणीभूत ठरली शेतकऱ्यांसाठी त्यांनी दुरोगामी योजना राबवल्या.
त्यामुळे त्यांना ‘हरित योद्धा’ म्हणून सुद्धा ओळखलं जातं शेती समाजकारण आणि राजकारणातील त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपुत्र आहेत अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता. अशा भारत मातेच्या थोर सुपुत्र बद्दल थोडसं जाणून घेऊया. 
जन्म-शिक्षण-नौकरी-विवाह आणि समाज
            यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली येथे वसंतराव नाईक यांचा जन्म १  जुलै १९१३ रोजी झाला त्यांचे वडील फुलसिंग बापू हे गहुली तांड्याचे सधन नायक होते. बंजारा समाजाच्या भटकंतीच्या अस्थिर आयुष्यातून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हे मोठे आयुध आहे हा त्यांचा थोर विचार होता. आणि ह्या विचाराचीच कास धरून नाईक साहेबाच प्राथमिक शिक्षण गहुली शेजारच्या पोहरा देवी, उमरी, भोजला आधी गावात झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नागपूरच्या मॉरिश कॉलेजमधून बीए ही पदवी मिळवली व एल एल बी ही पदवी सुद्धा मिळवली. १९४१ मध्ये त्यांनी वत्सलाताई घाटे यांच्याशी आंतरजातीय प्रेम विवाह केला. त्यानंतर काही काळ अमरावती येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या दर्शनात त्यांनी वकिली केली. त्यानंतर त्यांनी पुसद येथे वकिली व्यवसाय सुरू केला. गरजू लोक, शेतकरी यांचा त्यांना कळवळा होता. शेतकरी, दलित आदिवासी या घटकांसाठीच त्यांची वकिली समर्पित राहिली. त्यामुळे त्यांना सामाजिक बांधिलकी जपणारा वकील म्हणून संबोधले गेले.
बंजारा समाजाविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना वसंतराव नाईक सांगतात की -" माझ्या आई पेक्षा ही मला समाज अधिक प्रिय आहे " त्यांना समाजकार्याची आवड लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांकडून मिळाली होती समाजातील रूढी परंपरा व अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता. तसेच बंजारा समाजातील स्त्रियांच्या पोशाखात बदल करण्यासाठी ते नेहमी आग्रही होते. वडिलांचा थोर विचार समाज परिवर्तनासाठी शिक्षण हे आयुध आहे हे त्यांनी प्रत्यक्षात उतरवले. भटक्या विमुक्त जाती आणि जमातीच्या मुलांनाही इतर समाजातील मुलांप्रमाणे चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्रात एकूण ७०० आश्रम शाळा सुरू केल्या होत्या.
‘तम सावरेर साहेबर बाप छो,
छोरा छोरीन सिकावो’
असे आवाहन बंजारा समाजातील लोकांना दिले. मुलामुलींना शिखवन्यासाठी जनजागृती केली.
राजकीय कारकीर्द वकिली करत असताना वसंतराव नाईक यांचा जनसंपर्क वाढत गेला त्यांच्या वकिलीला सामाजिक जाणीवांची किनार होती त्यामुळे ते लोकप्रिय होत गेले. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यावेळी ते पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष होते. त्यावेळी विदर्भातील हा भाग मध्य प्रदेशात होता १९५१ मध्ये त्यांची मध्य प्रदेश मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी नियुक्ती झाली. १९४६ ते १९५२ दरम्यान ते पुसदचे नगराध्यक्ष होते. मध्यप्रदेश सरकारमध्ये १९५२ ते १९५६ दरम्यान ते महसूल खात्याचे उपमंत्री होते. १९५६ मध्ये राज्यांची फेररचना झाली. त्यात विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश मुंबई राज्यात झाला. त्यानंतर १९५७ मध्ये ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याचे निर्मिती झाली नाईक साहेबांनी महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री होण्याचा मान मिळवला. 1962 मध्ये मारोतराव कन्नमवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महसूल खात्याचा कारभार होता. २४ नोव्हेंबर 1963 रोजी कन्नमवार यांचे दुख्:द निधन झाले.त्यानंतर काँग्रेसने वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी संधी दिली. त्यानंतर ते सलग अकरा वर्षे ७८ दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होते.
वसंतराव नाईक केव्हा शेतकऱ्यांचेच मुख्यमंत्री नव्हते त्यांनी समाजातील शेतकरी, शेतमजूर, शोषित, वंचित अशा सर्वच घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी धोरणे आखून काटेकोरपणे अंमलबजावणी केली. शेती सोबतच त्यांनी उद्योग, कृषी, औद्योगिक विकासाला चालना दिली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ यासारख्या सहकारी संस्थेचे जाळे निर्माण केले. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली सहकार क्षेत्र अधिक बळकट झाले. आज सहकार क्षेत्रातील होणारी वाताहत पाहता वसंतराव नाईक साहेब यांच्या सहकार क्षेत्रातील सुवर्ण काळाची आठवण नक्कीच होते.
वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला शेती, शिक्षण, उद्योग सर्वच क्षेत्रात पुढे नेले. पंचायत राज, रोजगार हमी योजना ही त्यांची देण आहे, त्यांचे निर्णय दुरागामी होते. दूरदृष्टी असलेले त्यांचे व्यक्तिमत्व चतुरस्त्र होते. जनतेच्या प्रश्नाची जाण, प्रशासनातील त्यांची पकड, योजना कार्यान्वित करण्याचे वकुब, सहकाऱ्यांमध्ये समन्वय व विरोधकांनाही सन्मान ही त्यांची कार्यशैली निश्चितच प्रशासनीय म्हणावी लागेल.
जेव्हा नाईक साहेब  मुख्यमंत्री झाले त्यावेळी राज्यात शेतकरी कामगार पक्षाचा दबदबा होता. शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष. होता मुंबईतील कामगार संघटना डाव्या पक्षांच्या होत्या. डाव्या कामगार संघटनाच्या एका हाके वर मुंबई बंद होत असे. जॉर्ज फर्नाडीस यांचेही दबदबा प्रचंड वाढला होता. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली होती. शिवसेनेच्या उदयाने यावर उपाय उपलब्ध झाला होता. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये केली. वसंतराव नाईक उघडपणे शिवसेनेची पाठराखण करतात असा आरोपही व्हायचा. वसंतराव नाईक यांची शिवसेनेची जवळीक होती. त्यातूनच शिवसेनेला उपहासाने 'वसंत सेना' असेही म्हटले जायचे.
वसंतराव नाईक साहेब यांची मुख्यमंत्री म्हणून एक तपाची कारकीर्द स्थैर्य व गतिमान विकासासाठी उल्लेखनीय ठरली. दोन युद्धे, तीन मोठी राज्यव्यापी अवर्षणे यासारख्या संकटांना तोंड देतानाच त्यांनी शेतीचा अमुलाग्रह विकास करून महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविला. म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते मानले जाते. गहुली या छोट्याशा तांड्यातून वसंतराव चे नेतृत्व उदयास आले. एका अस्थिर तांड्यातून येऊन प्रदीर्घकाळ राज्याला स्थिरस्थावर सरकार देण्याची कसब फक्त वसंतराव नाईकातच होती, हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले.
शेती प्रिय साहेब मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांची ख्याती होती. जून महिन्यात पहिला पाऊस आला की वसंतराव नाईक आपल्या खिशातून पैसे आपल्या शिपायाला द्यायचे आणि त्याला पेढे वाटायला लावायचे. त्यांची शेती आणि शेतकऱ्यावर असणार प्रेम आपुलकी यातून सिद्ध होते.
 भूमिहीनांना भूमी देणारा...
 रोजगाराची हमी देणारा...
 पाऊस आला की पेढे वाटणारा...
 डोळ्यात हिरवं सपन थाटणारा...
 महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेव मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. जे म्हणाले होते -"शेतकरी सुखी तर ते सुखी!
 अशा महामानवास महानायकास जयंतीनिमित्त  त्रिवार वंदन!!!
                     
                                                             लेखक
                                                       प्रा. जय चव्हाण
                                          ( संयोजक अखिल भारतीय बंजारा युवक परिषद )
                                                                         7774963413

No comments:

Post a Comment

फॉलोअर