Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, June 30, 2025

सचिवाच्या कारस्थानामुळे शेकडो शेतकरी कर्जवंचित; आत्महत्येचा इशारा देत केली तक्रार

दिग्रस, 30 जून (सुरेश चिरडे) –
दिग्रस तालुक्यातील आमला, वाईमेंढी तसेच अन्य 10 गावांतील शेकडो शेतकरी यंदाच्या हंगामासाठी कर्जाच्या आशेवर होते. 2024 मधील कर्जाची परतफेड वेळेत करूनही, 2025 सालासाठीचे नवीन कर्ज मिळालेले नाही. यामागचे धक्कादायक कारण म्हणजे ग्रामविकास सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव लक्ष्मण वामनराव डाखोरे यांनी शेतकऱ्यांकडून रक्कम स्वीकारून पावत्या दिल्या, परंतु ती रक्कम बँकेत जमा केलीच नाही.

या प्रकारामुळे शेकडो शेतकऱ्यांचे कर्जप्रकरण अडकल्याने त्यांना पेरणीसाठी बँकेकडून कर्ज मिळाले नाही. एप्रिल महिन्यापासून वाट पाहणारे शेतकरी आज 30 जून रोजी अखेर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, दिग्रस आणि सहाय्यक निबंधक कार्यालयात धाव घेत तक्रार नोंदवली.

"आम्ही खाजगी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरणी केली आहे. आता जर बँकेकडून कर्ज मिळणार नसेल तर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही," असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत सचिव डाखोरे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. मात्र, निलंबनानंतरही त्यांनी नवीन सचिवाला प्रभार दिलेला नसल्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे.

प्रशासनाकडून तीन ते चार दिवसांत योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

हा प्रकार म्हणजे एक गंभीर आर्थिक अन्याय असून, सहकार क्षेत्रातील अशा भ्रष्टाचाराला चाप लावण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर