कारंजा (ता. ३१ मे २०२५) –( साप्ता.दिग्रस एक्सप्रेस)येथील आंबेडकरवादी साहित्य संमेलनाला शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वाशीम येथील राजस्थान महाविद्यालयाचे मराठी प्राध्यापक आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. विजय जाधव होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी बौद्धधर्माचा भारतीय संस्कृतीवर सखोल आणि अवीट ठसा असल्याचे सांगितले. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होऊन महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे क्रांती योद्धे झाले, असे त्यांनी नमूद केले.
आजही देशात जातीयवाद, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, व्यसनाधीनता, आर्थिक विषमता, महिला अत्याचार, गर्भलिंग निवड या गंभीर समस्या आहेत, असे त्यांनी सांगितले. शिक्षणाचे प्रमाण वाढले तरी शैक्षणिक क्रांती अद्याप बाकी आहे. बेरोजगारी, तात्पुरत्या नोकऱ्या आणि नव्या शैक्षणिक धोरणामुळे निर्माण झालेला गोंधळ यावरही त्यांनी भाष्य केले. डॉ. आंबेडकरांच्या विचारांची आजच्या परिस्थितीत नितांत आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. बळवंतभाऊ वानखडे यांच्या हस्ते झाले. त्यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकरांच्या साहित्य आणि विचारामुळेच आपण खासदार होऊ शकलो. स्वागताध्यक्ष प्रकाशजी रविराज यांनी साहित्यातून विचारांची देवाणघेवाण होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितांमध्ये सुधाकरराव वासे, गजानन आमदाबादकर, राजूभाऊ अवताडे, सुधाकरराव गर्जे, चंद्रशेखर खंडारे आणि पंजाबराव वर होते. प्रमुख संयोजक प्रा. राम शेजव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मा. श्री. चौधरी सर यांनी केले तर दुसरे संयोजक मा. दिनेश बनसोड यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. राम शेजव लिखित ‘हुंकार चैत्यभूमीचा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशनही झाले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात परिसंवाद आयोजित करण्यात आला. वामनराव गवई (अमरावती) यांनी ‘जनसुरक्षा विधेयक : अभिव्यक्ती स्वातंत्र्याला घातक’ या विषयावर व्याख्यान दिले. प्रा. डॉ. प्रशांत विघे (अमरावती) यांनी ‘भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता व आजचे वास्तव’ यावर विवेचन केले. तिसऱ्या सत्रात कवी संमेलन झाले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र ताजने (वाशीम) होते. निमंत्रित कवी म्हणून शेषराव धांडे, अनिल कांबळे आणि प्रा. अनुप नांदगावकर यांची उपस्थिती होती.
समारोप कार्यक्रमाने या एक दिवसीय संमेलनाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment