वाशिम,दि.६ जुन (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) जिल्ह्यातील विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, प्रलंबित कामे गती मिळावी आणि जनतेला तातडीने सुविधा मिळाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधत ठोस पावले उचलावीत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास तसेच औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आज दि.६ जुन रोजी आढावा बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री.भरणे बोलत होते.
बैठकीला विधानसभा सदस्य आमदार श्याम खोडे, विधानपरिषद सदस्य किरणराव सरनाईक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी कृषी, जलसंधारण, महावितरण, पाणीपुरवठा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी विभागांच्या योजनांची तपशीलवार माहिती घेतली.अनेक विकासकामे प्रलंबित असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी ती तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
जलसंधारणाची कामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळवून द्यावा. महावितरण विभागाने वीजपुरवठा सुरळीत राहील याची खात्री करावी. आरोग्य सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करून प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री पुरवावी.
पाणीपुरवठा योजनांमध्ये विलंब टाळण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दर्जाबाबत विशेष लक्ष द्यावे.असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
श्री. भरणे पुढे म्हणाले,विकासकामे केवळ कागदावर राहता कामा नये, तर ती जमिनीवर प्रत्यक्षात उतरली पाहिजेत. जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन काम करणं हीच खरी जबाबदारी आहे, असे मत त्यांनी बैठकीदरम्यान व्यक्त केले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना एकमेकांमध्ये समन्वय ठेवत निर्णय प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याच्या सूचना केल्या.
नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबतही चर्चा झाली. यामध्ये पाणीटंचाई, आरोग्य सुविधा, अपूर्ण रस्ते, अपुऱ्या वीजपुरवठ्याचे मुद्दे उपस्थित झाले. पालकमंत्र्यांनी या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
बैठकीला विविध विभागाचे यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
No comments:
Post a Comment