Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, June 3, 2025

विशेष लेख हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

      विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांना कलाटणी देणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 11 डिसेंबर 2022 रोजी पार पडले. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्याचे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी (कोकणमठाण) ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंज दरम्यान एकुण 80 कि.मी लांबीचे लोकार्पण दि. 26 मे 2023 रोजी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी पर्यंतच्या 25 किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण दि. 4 मार्च 2024 रोजी  मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले होते. एकूण 701 कि.मी पैकी 625 कि.मी लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरु असून आतापर्यंत जवळजवळ 2 कोटी वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे. आता, समृद्धी महामार्गाची उर्वरित 76 कि. मी लांबीचे (इगतपुरी ते आमणे) लोकार्पण दि. 05 जून 2025 रोजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आहे.
देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा
समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यातील 76 कि.मी ची लांबी नाशिक व ठाणे जिल्ह्यात येते. सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अभियांत्रिकी आव्हान पेलले. या टप्प्यामध्ये एकूण 5 दुहेरी बोगदे असून या बोगद्यांची लांबी 10.73 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.46 कि.मी) आहे. त्यातील पॅकेज 14 (इगतपुरी) येथील बोगदा 8.00 कि.मी लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा (17.61 मीटर) बोगदा आहे. या बोगद्याची उंची 9.12 मीटर आहे. अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरीमधील सर्वात लांबीच्या बोगद्यामध्ये बसविण्यात आलेली आहे. या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहतुक अधिक जलद होणार आहे.

सर्वाधिक लांबीचा पूल
या 76 किमीच्या डोंगर दऱ्यामुळे व्हायाडक्ट (मोठे पूल) व बोगदे बांधणे हे मोठे जिकरीचे होते. काही ठिकाणी कठीण खडकात 30 ते 40 मीटरपर्यंत खोदकाम करावे लागले. या टप्प्यात एकूण 17 व्हायाडक्ट (मोठे व्हॅली पूल) असून त्याची एकूण लांबी 10.56 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.12 कि.मी) आहे. या टप्प्यात सर्वाधिक लांबीचा पूल (व्हायाडक्ट) 2.28 कि.मी लांबीचा आहे. या टप्प्यात एका ठिकाणी (व्हायाडक्ट-2) पुलाच्या काही खाबांची उंची 84 मीटरपर्यत आहे. 
इंटरचेंजस
या टप्प्यात इगतपुरी, खुटघर व आमणे येथे इंटरचेंज येतात. या शेवटच्या टप्यात मोठ्या प्रमाणात विद्युत उच्च तसेच कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या स्थंलातरित कराव्या लागल्या, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित च्या कमी दाबाच्या 62 वाहिन्या स्थंलातरित करण्यात आलेल्या आहेत, तसेच, टोरेंट पॉवरच्या 5 विद्युत वाहिन्या व पॉवर ग्रीडची 1 विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्यात आलेली आहे. तसेच, या टप्प्यात 1 रेल्वे ओलांडणी पुल बांधण्यात आलेला आहे. 
प्रवासातील सुलभता 
इगतपुरी ते आमणे (ता. भिवंडी) हा 76 किमीचा टप्पा वाहतुकीस सुरु झाल्यानंतर ठाणे (आमणे) व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासात गाठता येणार आहे. तसेच ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल. याशिवाय शिर्डी, अहिल्यानगर व नाशिक जिल्हयातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल.
प्रकल्पाची व्याप्ती
राज्याच्या पाच महसुल विभागाच्या 10 जिल्ह्यातील 26 तालुक्यांमधील 392 गावांमधुन जाणारा हा सहा पदरी महामार्ग ग्रीन फिल्ड संरेखन आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक व ठाणे ही 10 जिल्हे प्रत्यक्षरीत्या जोडले जातात. तसेच समृद्धी महामार्गामुळे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड ही 14 जिल्हे अप्रत्यक्षरीत्या जोडली जातात. या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी कमाल गती घाटामध्ये 100 किलामोटर प्रतितास आणि सपाट रस्त्यावर 120 किलोमीटर प्रतितास आहे. जुन्या नागपूर मुंबई मार्गावरुन नागपूरहून मुंबईकडे येण्यास 17-18 तास लागतात. नवीन "ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे" ने प्रवास 8 तासात करणे शक्य होणार आहे. आता मुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ते नागपूरस्थित मिहान यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे बंदरावरुन जलद वाहतुक करुन आवश्यक माल भारतभर वेळेवर पोहचवणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागास महत्वाचा ठरलेला आहे. 
पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या एकात्मिक नियोजन आणि पायाभूत सुविधा कनेक्टीव्हिटी प्रकल्पांच्या एकत्रित अंमलबजावणीचे समर्थन करणारा हा महामार्ग दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि शिर्डी, अजिंठा - वेरुळ लेणी, लोणार सरोवर आणि इतर पर्यटन स्थळांना जोडणारा आहे. तसेच समृद्धी महामार्गामुळे कृषी, पर्यटन, दळणवळण, उद्योग इ. क्षेत्रे विकसित होऊन तसेच लघु उद्योगांना चालना मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच इंधनाची आणि वेळेची बचत होणार आहे.
महाराष्ट्रातील फडणवीस- शिंदे -अजित पवार सरकारकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात मुलगामी परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. वंचित -उपेक्षितांच्या विकासास अग्रक्रमाने प्राधान्य देताना राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी ते कटिबध्द आहेत. देशाचे ग्रोथ इंजिन असणाऱ्या महाराष्ट्रासाठी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ही खऱ्या अर्थाने समृद्धीची भाग्यरेषा ठरणार आहे.

-तुषार अहिरे , जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

No comments:

Post a Comment

फॉलोअर