यवतमाळ,दि.१७ जुलै २०२५;( साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
जिल्ह्यात महावितरणकडून वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या 'ऊर्जामित्र दिनात' जाग्यावरच ११७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून प्रलंबित तक्रारीवर येणाऱ्या ऊर्जामित्र दिनापुर्वी निकाली काढण्याचे निर्देश देत मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी होणाऱ्या ऊर्जामित्र दिनाच्या उपक्रमात वीज ग्राहकांनी सहभाग नोंदवून आपल्या तक्रारीचे निरसन करण्याचे आवाहन केले.
महावितरणने जिल्ह्यात लोकशाही दिनाच्या धर्तीवर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी "ऊर्जामित्र दिन" राबविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.त्यामुळे महावितरणच्या जिल्ह्यात असेलेल्या चार विभागाअंतर्गत १८ उपविभागात (दि.८ जुलै) एकाच दिवशी 'ऊर्जामित्र दिना'चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा जिल्ह्यातील १२२ ग्राहकांनी लाभ घेतला.त्यापैकी ११७ तक्रारी तत्काळ सोडविण्यात आल्याने वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.
ग्राहकाने दाखल केलेल्या तक्रारींत प्रामुख्याने नावात बदल करणे, नवीन वीज जोडणी, टॅरिफमध्ये बदल,पत्त्यात बदल करणे, वीज बिलासंबंधित तक्रारी , विद्युत भारात बदल, आदींचा समावेश होता. यवतमाळ विभागाअंतर्गत दाखल झालेल्या २५ च्या २५ तक्रारी सोडविण्यात आल्यात.त्याचबरोबर दारव्हा विभागाअंतर्गत दाखल झालेल्या ४२ तक्रारीही सोडविण्यात आल्या. पांढरकवढा विभागात दाखल झालेल्या १६ पैकी १२ तक्रारीचे तत्काळ निराकरण करण्यात आले असून पुसद विभागात ३९ पैकी ३८ तक्रारी सोडविण्यात आल्यात. उर्वरित ५ तक्रारी सोडविण्यासाठी विशिष्ट प्रक्रीयेचे गरज असल्याने ,त्या विहीत मुदतीत सोडविण्याचे निर्देश मुख्य अभियंता यांनी दिले.
"ऊर्जामित्र दिन" या उपक्रमामुळे वीज ग्राहकांच्या आपले म्हणने मांडण्यासोबत तक्रारी सोडविण्यासाठी अधिकची सोय महावितरणने उपलब्ध केली आहे.याव्यतिरिक्त महावितरणच्या दैनंदिन कामकाजात आलेल्या तक्रारी त्या - त्या वेळेत सोडविण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांनी दिली.
No comments:
Post a Comment