दिग्रस –(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस )शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नवोदय विद्यालयांची प्रवेशपूर्व परीक्षा येत्या 13 डिसेंबर 2025 रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे याच वर्षी, म्हणजे 18 जानेवारी 2025 रोजीच सत्र 2024-25 साठीसुद्धा नवोदय पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे एकाच कॅलेंडर वर्षात दोन वेळा नवोदय पूर्व परीक्षा होणे हे इतिहासात पहिल्यांदाच घडत असून, येणाऱ्या वर्षातील नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी मिळणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे.
या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातील जाणकार, नवोदय परीक्षेची तयारी करून घेणारे होतकरू शिक्षक, शिक्षक संघटना, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि पालकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. "शैक्षणिक सत्र हे प्रत्यक्षात जून-जुलैपासून सुरू होते आणि त्यानंतर अवघ्या ५-६ महिन्यांतच परीक्षा घेणे उचित आहे का?" असा सवाल अनेकांकडून विचारला जात आहे.
अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमनी सुभाष इंगोले यांनी या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की "शहरी भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सहज उपलब्ध होते, परंतु दुर्गम, ग्रामीण, वाड्या, वस्त्या, पोड आणि तांडे तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना इतक्या कमी वेळात योग्य मार्गदर्शन मिळेल का, याबाबत शंका आहे. मोठी पटसंख्या असलेल्या आणि दोनच शिक्षक असलेल्या शाळांमध्ये तयारी कशी होणार हा मोठा प्रश्न आहे."
नवोदय विद्यालयाची तयारी करून घेणारे दिग्रस येथील शिक्षक नितीन डहाके यांनी सांगितले की, पूर्वी नवोदय परीक्षा मार्च महिन्यात घेतली जात होती, तेव्हा अभ्यासक्रम पूर्ण करून तयारीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळत असे. मात्र आता डिसेंबरमध्ये परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी फेब्रुवारी महिन्यात नवोदय प्रवेश परीक्षा घेतल्यास ग्रामीण व शहरी विद्यार्थी यांना फायदा होईल. यावर्षी ग्रामीण विभागातील शंभर टक्के विद्यार्थी बसविण्याचा यवतमाळ जिल्हा परिषदेचा मानस आहे. अशा परीक्षेच्या तयारीतून मुलांची स्पर्धा परीक्षेची तयारी होत असल्याने सर्व अभ्यासक्रम शिकवणे आणि त्याचा सराव होणे आवश्यक आहे. परीक्षा होईपर्यंत मुले आवडीने आणि जिद्दीने अभ्यास करतात. त्यामुळे ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात यावी. असे मत नगर परिषद दिग्रस येथील पीएमश्री स्कूलचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख मयूर दुधे यांनी सुद्धा व्यक्त केले.
यावेळी प्रशासनाची अनिर्णित भूमिका देखील चर्चेचा विषय बनली आहे. कधी जात प्रमाणपत्र बंधनकारक सांगितले जाते, तर कधी फक्त घोषणापत्र चालते असे सांगितले जाते. यामुळे पालक व शाळा गोंधळात पडले आहेत.
डॉ एपीजे अब्दुल कलाम फोरम आणि इतर संघटनांचे मत आहे की, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळायचे असेल तर पूर्वीप्रमाणेच नवोदय पूर्व परीक्षा मार्च महिन्यातच घेण्यात यावी. ग्रामीण भागातील शिक्षक, पालक यांनी यासाठी वेळेवर आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा अनेक होतकरू विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेशाची चांगली संधी गमवावी लागेल अशी भीती व्यक्त केली आहे.
---
प्रतिक्रिया चौकट :
"ग्रामीण मुलांसाठीच नवोदय विद्यालयाचे प्रयोजन असून नवोदय परीक्षेच्या तयारीला यावर्षी खूपच कमी वेळ मिळणार असल्याने याचा फटका ग्रामीण विद्यार्थ्यांना बसणार आहे. नवोदय परीक्षेचा अभ्यासक्रम बराच मोठा असून केवळ चारपाच महिन्यात एवढा अभ्यास व सराव करून घेणे शक्य नाही."
- गजानन गवई, जि. प. शाळा, बाणगाव, नेर.
No comments:
Post a Comment