*वाशीम, दि. 14 जुलै 2025 : (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
पावसाळ्यात विजेच्या तारा, भिंती किंवा विद्युत उपकरणांमध्ये वीजप्रवाह उतरण्याचे प्रकार वाढतात. त्यामुळे अशा धोकादायक अपघातांपासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक घर, दुकान व आस्थापनामध्ये योग्य क्षमतेचे सर्किट ब्रेकर व अर्थिंग असणे अत्यावश्यक असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
घरगुती वायरिंगमधील बिघाड, करंट लिकेज आणि अर्थिंगचा अभाव ही वीज अपघातांची मुख्य कारणे आहेत. यावर उपाय म्हणून MCB, ELCB किंवा RCCB हे ब्रेकर लावल्यास विजेचा अति भार, शॉर्ट सर्किट किंवा धक्का लागल्यास काही मिलीसेकंदांत वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे आग, उपकरणांचे नुकसान आणि संभाव्य जीवितहानी टाळता येते.
फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, पंखे यांसारख्या महागड्या उपकरणांना शॉर्ट सर्किटपासून वाचविण्यासाठी सर्किट ब्रेकर उपयुक्त ठरतो. शिवाय, विशिष्ट भागाचे सर्किट बंद करून सुरक्षितपणे दुरुस्ती करता येते, ज्यामुळे संपूर्ण घराचा वीजपुरवठा खंडित करण्याची गरज राहत नाही.
महावितरणने अर्थिंगला देखील तेवढेच महत्त्व दिले आहे. वीजप्रवाह जमिनीमध्ये सुरक्षितरीत्या वाहून नेण्यासाठी अर्थिंग गरजेचे असून नवीन इमारतींसाठी ते बंधनकारक, तर जुन्या इमारतींसाठी तातडीने करणे आवश्यक आहे. दर दोन वर्षांनी अर्थिंगची तपासणी करावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
फक्त उपकरणेच नव्हे तर स्वतःचे संरक्षणही महत्त्वाचे असल्याने विजेचा टेस्टर वापरणे, रबरी चप्पल घालणे, व ओल्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे.
महावितरणने नागरिकांना वीज सुरक्षेला वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment