दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
भारत दूध उत्पादनात स्वयंपूर्ण असूनही अमेरिका दूध निर्यातीसाठी आग्रही आहे. अमेरिकेशी करार करतांना सारे घोडे दुधावर अडले आहेत. मांसाहारी दूध ही भारत अमेरिका व्यापारी करारातील मोठी अडगळ ठरली असून त्यामुळे करार व्हायचा थांबला आहे. मात्र भारतात अमेरिकेतील मांसाहारी दूध आयातीला परवानगी देणं म्हणजे शेती, शेतीपूरक उद्योग धंदे आणि छोट्या भारतीय उद्योगधंद्यांना देशोधडीला लावणे होय अशी माहिती प्रा. सुधीर पाठक यांनी दिली. येथील बुटले महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष आणि डीव्हीएसपी मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार बंग अध्यक्षस्थानी तर मंडळाचे सचिव डॉ अभय पाटील, प्राचार्य अरविंद लाडोळे मंचावर उपस्थित होते.
"भारतीय कृषी आणि दुग्ध बाजारपेठेवर अमेरिकेची नजर आहे. या दोन क्षेत्रात अमेरिकेला भारतीय बाजारपेठ काबीज करायची आहे. आधीच भारतीय शेतकरी अनेक संकटाना तोंड देत असून त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे भारताने अमेरिकेच्या दुग्ध व्यापाराची अट मान्य केल्यास येथील शेतीला जोडधंदा म्हणून केला जात असणारा दुग्ध व्यवसाय संपायला वेळ लागणार नाही. कारण अमेरिका सुरवातीला 15 टक्के कमी दराने दुधाची विक्री करण्यास तयार आहे. त्यामुळे हा व्यापारी करार म्हणजे शेतकऱ्यांचं मरण असून दुधाशिवाय व्यापारी करारास मान्यता मिळवण्यासाठी भारत सरकारने कसोशीने प्रयत्न करायला हवेत असे ही प्रा. पाठक यांनी सुचविले.
दुग्ध व्यवसाया चॉकलेट, आईस्क्रीम आणि दुधाशी संबंधित इतर पदार्थांची निर्मिती करणाऱ्या कंपन्याही देशोधडीला लागतील. अमेरिकेसोबतच चीन सारखे इतर देशही कृषी आणि दुग्ध व्यवसायासाठी भारतात पाय पसरवू लागतील. शिवाय मांसाहारी दुधासोबत मांसाहारी तांदूळ देखील भारतात येईल असे अनेक धोके त्यांनी विषद केले. प्रा. डॉ. नरेंद्र मनवर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बुटले महाविद्यालयातील यावर्षीच्या विज्ञान क्लबचे उद्घाटन प्रा. पाठक यांच्या हस्ते झाले. विज्ञान क्लबची कार्यकारिणी यावेळी घोषित करण्यात आली.
व्याख्यानासाठी डॉ. अशोक नालमवार, क्रीडा प्रशिक्षक सुरेश शर्मा, नीरज दुद्दलवार, मोहनाबाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता नगराळे, अभियंता संजय निरपासे, गजानन गंगथडे, रचिता दुद्दलवार, अल्फा जैन रोकडे, प्रा . वसंत जाधव, प्रा. राजेंद्र वानखडे, प्रा. प्रविण चांडक, प्रा. डॉ. अपर्णा पाटील, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. अल्फिया शेख आणि ऋतुजा रेवणे यांनी संचलन तर नेहा साखरकर हीने आभार मानले. विज्ञान क्लब समन्वयक प्रा. मनवर यांच्या मार्गदर्शनात विज्ञान क्लबच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment