यवतमाळ,दि.१३ सप्टेंबर २०२५; (सप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन सातत्याने कार्यरत असून शेतकऱ्यांना शाश्वत आणि दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मागेल त्याला सौर कृषीपंप ,मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, या महत्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी वेगाने करण्यात येत असून डिसेबंर २०२६ पर्यंत जिल्ह्यातील १००% शेतकऱ्यांना दिवसा १२ तास आणि मोफत वीज उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यवतमाळ येथे विविध विकास कामांचे लोकार्पण,भूमिपूजन आणि शुभारंभ कार्यक्रमात महावितरणच्या सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत पूर्ण झालेल्या आणि ३५ मेगावॅट क्षमता असलेल्या जिल्ह्यातील ११ सौर प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख, आमदार राजू तोडसाम, आमदार किसनराव वानखेडे, कई काई डहाके, संजय देरकर, श्याम कोडे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी विकास मीना,अधीक्षक अभियंता प्रविण दरोली आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत ९३ उपकेंद्रासाठी सौर प्रकल्पाची उभारणी करण्यात येत असून ,या प्रकल्पाच्या माध्यमातून ३९४ मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी ३५ मेगावॅट क्षमता असलेल्या आणि १५८ कोटी रूपये खर्च करून पुर्ण करण्यात आलेल्या ११ सौर प्रकल्पामुळे जिल्ह्यातील १६७ गावातील १४ हजार ८९३ शेतकऱ्यांना शाश्वत आणि दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या तसेच महावितरण आणि अवादा या विकासकाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेल्या ११ सौर प्रकल्पात सारफळी (३ मे.वॅ.),सावरगाव (३ मे.वॅ.), परजाना (४ मे.वॅ.),पाथ्रड (४ मे.वॅ.),गळवा (२ मे.वॅ.),म्हसोला (५ मे.वॅ.),
पाटण (२ मे.वॅ.),बानसी (२ मे.वॅ.),
डोंगरखर्डा (३ मे.वॅ.),बाळदी (३ मे.वॅ.) आणि
किन्ही (४ मे.वॅ.)या सौर प्रकल्पाचा समावेश असून या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील १६७ गावातील १४ हजार ८९३ शेतकऱ्यांचे दिवसा विजेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
No comments:
Post a Comment