दिग्रस : ऋषिकेश हिरास
दिग्रसमध्ये मोठ्या प्रमाणावर नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या दरम्यान संपूर्ण परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भवानी माता मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात. या करिता शहरातून जाणाऱ्या लोकांसाठी शहरातील छत्रपती संभाजी नगर परिसरातून रस्ता आहे. परंतु या मार्गावर मोठ्या प्रमाणावर उकिरडे आणि कचरा फेकला जात असल्याने संपूर्ण परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून नवरात्री उत्सव अगदी १० दिवसांवर येऊन ठेपल्याने भवानीमातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.
दरवर्षी नगर पालिका प्रशासन भवानी माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाचे व्यवस्थापन करीत असते परंतु गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याकडे लक्ष द्यायला पालिकेला वेळ नाही. या रस्त्यावर नेहमीच काचाऱ्याचे ढिगारे पडलेले असतात. या भागातील नाल्यांची साफसफाई नियमित केली जात नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या या दुर्लक्षित धोरणामुळे भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येत्या ता.२२ सप्टेंबर २०२५ पासून नवरात्री उत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे पहाटे ४ वाजतापासून भाविकांची पाऊले भवानी माता मंदिराकडे वळतांना पाहायला मिळतात आणि दिवसभर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. भाविकांना या उकिरड्यातुन जाऊन मंदिरात दर्शन घ्यावे लागते. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून लवकरात लवकर त्या मार्गावर स्वच्छता व आवश्यक व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे. तसेच हे नवरात्रीचे ९ दिवस नाही तर वर्षाचे ३६५ दिवस रस्त्यावर उकिरडा न करण्याचे आदेश संबंधित उकिरडा करणाऱ्याला द्यावे, अशी मागणी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडून होत आहे.
रस्त्याची दुरुस्ती अन् लाईटच्या व्यवस्थेची आवश्यकता --
छत्रपती संभाजी नगरातील नाल्यापासून भवानी टेकडीच्या प्रवेशद्वारा पर्यंतचा रस्ता ठिकठिकाणी उखडलेला असून रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच प्रवेशद्वारापासून तर भवानी मातेच्या मंदिरापर्यंत देखील अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. मुरूम टाकून या रस्त्यावरील खड्डे तात्पुरते बुजवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला मात्र पाऊस पडला की चिखल झाल्याने याठिकाणी अनेकदा अपघात झाल्याचे पाहायला मिळते. छत्रपती संभाजी नगर पासून तर भवानी टेकडीच्या प्रवेशद्वारापर्यंत आणि मंदिरापर्यंत असलेले विद्युत दिवे बंद असल्याची माहिती आहे. त्यामुळे रात्रीला या मार्गावर काळाकुट्ट अंधार असतो, नवरात्रोत्सवात भाविकांची रात्री देखील रेलचेल असते, त्यामुळे रस्त्याची डांबरीकरणासह दुरुस्ती व रस्त्याच्या कडेला विद्युत दिव्यांची व्यवस्था प्रशासनाने करून देण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment