दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा यंदाच्या सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक लौकिकात भर पडली आहे.
प्राथमिक विभागातून जिल्हा परिषद शाळा, खंडाळा तालुका आर्णी येथील विजय जाचक व आदिवासी विभागातून जिल्हा परिषद शाळा शिरोली तालुका घाटंजी येथील राजेंद्र गोबाडे यांची निवड झाली असून, माध्यमिक विभागातून दि न्यू इंग्लिश हायस्कूल नेर येथील डॉ. प्रशांत बुंदे हे मानकरी ठरले आहेत. मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात उपमुखमंत्री अजित पवार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या तिघांनाही नुकतेच गौरविण्यात आले आहे. एक लक्ष रु रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन तिघांचाही सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
या तिघांनीही शैक्षणिक कार्यात नवनवीन प्रयोग, विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता व चारित्र्यविकास घडविण्याचे उपक्रम राबवून आपल्या कार्यक्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांचा गौरव म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा गौरव असल्याची भावना राष्ट्रीय, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आमीन चौहान यांनी व्यक्त केली आहे. गट शिक्षण अधिकारी मंगेश देशपांडे यांचेसह पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे आसाराम चव्हाण, प्रशांत पंचभाई, डॉ साईनाथ चंदापुरे, के. बी. पठाण, डॉ अवधूत वानखेडे, कैलास गव्हाणकर, किशोर बनारसे, नरेंद्र भंडारकर, अविनाश रोकडे, दिनेश घाटोळ, दीपक कुमार पडोळे, संदीप कोल्हे, पंचशीला इंगोले, विजय विश्वकर्मा, विजय वाघ, प्रमोद देशमुख, पुण्यरथा नगारे, वैभव जगताप, विलास राठोड, साहेबराव हटवार यांनी या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले असून समाजमनावर सकारात्मक छाप पाडणाऱ्या या तिघा शिक्षकांवर जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षकांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आल्याने शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
No comments:
Post a Comment