मानोरा : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी निवासी माजी आमदार अनंत कुमार पाटील राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत पोहोचावी यासाठी शासनाकडून मिळत असलेल्या निवृत्ती वेतनातील एक महिन्याची पेन्शन उपरोक्त आपदाग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले आहे.
अनंत कुमार पाटील यांनी राज्य विधिमंडळाचे ज्येष्ठ सभागृह विधान परिषदेत दोन वेळा लोकप्रतिनिधी होण्याचा मान मिळाला असून ते विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभेत सुद्धा निवडून आलेले असल्याने तालुक्यातील ज्येष्ठ माजी आमदार आहेत.
तालुक्यासह राज्यातील बळीराजा नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असून सातत्याने होत असलेला पाऊस व काही भागांमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेती व पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी विपत्तीने ग्रस्त झालेला आहे. राज्यातील लाखो हेक्टर खरीप पिके यावेळी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे न भरून निघू शकणारे नुकसान झालेले आहे .
बळीराजाला उभारी मिळण्यासाठी आपले कुटुंब चालावे यासाठी शासनाकडून मिळत असलेल्या कुटुंब निवृत्ती वेतनातील एक महिन्याची रक्कम उपरोक्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून देत असल्याची माहिती माजी आमदार पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.
No comments:
Post a Comment