Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, October 1, 2025

यवतमाळ येथे बंजारा समाजाचा विराट जनआक्रोश मोर्चा


यवतमाळ : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
महाराष्ट्रातील बंजारा व तत्सम समाजाला हैद्राबाद गॅझेटियर व सी.पी. ॲन्ड बेरार गॅझेट नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण मिळावे, या न्याय्य मागणीसाठी यवतमाळ जिल्हा बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी यवतमाळ शहरात विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा पूर्णतः शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक ठरणार असल्याचे आयोजक समितीने स्पष्ट केले आहे.

हैद्राबाद गॅझेटियर, सी.पी. ॲन्ड बेरार गॅझेट तसेच विविध आयोगांच्या शिफारशींनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमातीत मोडतो. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यमान आरक्षणाला बाधा न आणता स्वतंत्र अनुसूचित जमाती (ब) सूची तयार करून त्यामध्ये बंजारा समाजाचा समावेश करावा, हा या मोर्चाचा प्रमुख उद्देश आहे.

मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता संत सेवालाल महाराज चौक, आर्णी रोड येथून होणार असून मार्गक्रमण वडगाव ग्रामपंचायत → बिरसा मुंडा चौक → जिल्हा परिषद → संविधान चौक → एल.आय.सी. चौक → पोस्टल ग्राउंड असा असेल. पोस्टल ग्राउंड येथे मोर्चाचे रूपांतर विशाल सभेत होईल. या सभेत प्रमुख समाजनेते मार्गदर्शन करतील व जिल्हाधिकारी कार्यालयाला मागण्यांचे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप होईल.

आयोजक समितीच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमधून सुमारे १ ते १.५ लाख महिला, युवक, विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार आहे.

मोर्चाचे वेळापत्रक:

सकाळी १०:३० वा.: संत सेवालाल महाराज चौक येथे जमवाजमव

सकाळी ११:०० वा.: ध्वजपूजन व उद्बोधनानंतर मोर्चाची सुरुवात

दुपारी १:०० वा.: पोस्टल ग्राउंड येथे सभा

जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन सादर करून समारोप


मुख्य मागण्या:

हैद्राबाद गॅझेटियर व सी.पी. ॲन्ड बेरार गॅझेटनुसार बंजारा व तत्सम जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा हक्क द्यावा.

अनुसूचित जमातीला बाधा न आणता स्वतंत्र अनुसूचित जमाती (ब) सूची तयार करावी.

आरक्षणासंबंधी सर्व संदिग्धता दूर करून शासनाने स्पष्ट व ठोस निर्णय तात्काळ जाहीर करावा.

समाजावर अन्याय करणारे प्रशासनिक अडथळे दूर करावेत.


मोर्चादरम्यान शांतता व शिस्त राखण्यासाठी स्वयंसेवक पथके नियुक्त केली असून पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. समाजातील कोणत्याही घटकाविरुद्ध अपमानास्पद विधान अथवा सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकू नये, असे स्पष्ट आवाहन आयोजक समितीने केले आहे.

पत्रकार, छायाचित्रकार व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनी या मोर्चाचे वृत्तांकन करून समाजाच्या न्याय्य मागण्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती आयोजक समितीने केली आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर