मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
आमकिंन्ही (ता. मानोरा, जि. वाशीम)
गावातील साधारण कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आनंद अजय जाधव यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत यश संपादन करत गाव, तालुका आणि जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
आनंद यांनी प्राथमिक शिक्षण आमकिंन्ही येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण दिग्रस येथे पूर्ण केले. विज्ञान शाखेचा विद्यार्थी असूनही वाणिज्य क्षेत्रातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या CA अभ्यासक्रमाची निवड करत त्यांनी जिद्द, चिकाटी आणि सततच्या अभ्यासाच्या बळावर हा कठीण प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.
फाउंडेशननंतर आंतर (Intermediate) आणि अंतिम (Final) परीक्षा देखील उत्तीर्ण करत त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी संपादन केली. या प्रवासात अनेक अडचणी, मानसिक ताण, तसेच सामाजिक कार्यक्रम व वैयक्तिक आनंदाचे क्षण त्याग करावे लागले, मात्र स्वःतावरील विश्वास, पालकांचे मार्गदर्शन आणि मोठ्या भावाचे प्रेरणादायी सहकार्य यामुळे आनंदने आपल्या स्वप्नाला वास्तवात आणले.
“अनेकदा वाटत होतं की प्रवास थांबवावा, पण दुसरा पर्याय नव्हता. सातत्य, मनाचा निर्धार आणि कुटुंबाचा आधार यामुळेच हे शक्य झालं,” असे आनंद यांनी सांगितले.
आनंद यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, परिसरात त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment