डोंगर दर्यात राहणारा, आपल्या कष्टावर व मेहनतीवर उपजीविका करणारा आदिम गोर बंजारा समाज आपल्या संपन्न संस्कृतीची विशेष ओळख करुन देणारा हा आदिम समाज देशभर विखुरलेला आहे. एक लढवय्य, शूर, पराक्रमी समाज म्हणूनही तो ओळखला जातो. इंग्रजाच्या १८७१ च्या जन्मजात गुन्हेगार ठरणाऱ्या काळ्या कायद्याने या समाजाचे सर्व उपजीविकेची साधनं हिसकावून घेऊन अतिशय क्रूरतेची अमानवीय वागणूक देऊन त्याला प्रवाहाबाहेर फेकण्यात आले. स्वतंत्र्यानंतरही त्याचे दैन्य संपले नव्हते. आजही विविध स्तरावर ससेहोलपट चालू आहे.
विसाव्या शतकातील सहाव्या दशकात गोर बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक साहेबांच्या रुपाने एक आशेचा किरण निर्माण झाला. आपल्या स्व कर्तृत्वावर वसंतराव नाईक साहेब राजकारणाच्या एक-एक पायऱ्या चढत गेले आणि ५ डिसेंबर १९६३ हा दिवस सुवर्ण अक्षराने नोंदवला गेला. या दिवशी वसंतराव नाईक साहेबांनी प्रथम मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा सुवर्ण दिवस आपल्यासाठी गौरवपूर्ण असा होता. डोंगरदर्यात राहणाऱ्या आपल्या समाजासाठी ही अभिमानाची व गौरवाची बाब होती. हा दिवस आपल्या समाजाला एकप्रकारे गौरव प्राप्त करुन देणारा होता. जन्मजात गुन्हेगारीचे चटके सोसलेल्या समाजाने या दिवसाला विशेष महत्व देऊन आपण साजरा करायलाच हवा.
*गौरवदिनाची संकल्पना*
समाजाला एका सूत्रात बांधण्यासाठी ५ डिसेंबर हा गौरवदिन म्हणून साजरा करण्याची कल्पना सुचली आणि व्यापक प्रमाणावर ५ डिसेंबर २०१७ रोजी गहुली व भक्तिधाम येथे गौरवदिन साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाला समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
*गौरवदिन का?*
*गौरव* हा शब्द सन्मान, मान, आदर, गर्व, किंवा अभिमान व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. जसे की, देशाचा सन्मान किंवा देशाचा गौरव, एखाद्या समाजाचा गौरव किंवा
सन्मान आणि आदर अशा विविध प्रकारे गौरव शब्द प्रयोग केला जातो.
आणि त्यामुळे ५ डिसेंबर १९६३ हा दिवस आपल्या समाजाच्या दृष्टीने गर्वाचा, अभिमानाचा, प्रतिष्ठा प्राप्त करुन देणारा गौरवाचा दिवस होता. ही घटना एक गौरवशाली घटना होती. म्हणून या दिवशी सकल गोर बंजारा समाजाने आपले सारे मतभेद, विचारभेद, राजकीय भेद, संघटनात्मक भेद, जे जे भेद असतील ते बाजूला सारुन एक दिवस गहुली (गौरवभूमी) येथे एकत्र जमावे. समाजाच्या विविध प्रश्नांवर चिंतन मंथन करावे. समाज एकजुटीच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीचा संकल्प घेऊन पुढील वाटचाल करावी. ही विशुद्ध भावना गौरवदिन साजरा करण्यामागील आहे.
समाज एकजुटीसाठी गहुली (गौरवभूमी) येथेच व्यापक स्वरुपात गौरवदिन साजरा करण्याची संकल्पना आहे. पण अजून आम्हाला याचे महत्व पटलेले दिसत नाही. म्हणून जेथे शक्य असेल तेथे गौरवदिन साजरा करण्यास हरकत नाही. आज नाही तर भविष्यात कधी तरी या विचाराचे महत्व समाजाला नक्कीच कळेल.
बांधवांनो, ५ डिसेंबर रोजी गौरवदिन साजरा करण्यामागील विशुद्ध भावना समजून घेऊन आपण आपापल्या भागात तो साजरा करावा.
दिनांक ०४/१२/२०२५
संभाजीनगर
*फुलसिंग जाधव*
सामाजिक कार्यकर्ता
छत्रपती संभाजीनगर
संपर्क: ८९९९०९८२६५
-------------------------------
No comments:
Post a Comment