मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस):
बंजारा समाजाच्या हक्क आणि अधिकारासाठी गेल्या २५ वर्षांपासून संपूर्ण भारतात लढणारी अग्रणी संघटना 'गोरसेना गोरशिकवाडी'च्या 'गोर गवळ्या दल' या विंगच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आसोला खुर्द येथील विजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल मानोरा येथे बंजारा समाजाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
लोकगीतांतून होणार संस्कृतीचे जतन
गोरसेना ही संघटना गोरसेना, गोरशिकवाडी, याडी धरमळी दळ आणि गोर गवळ्या दळ अशा विविध आघाड्यांमार्फत तांड्या-तांड्यावर जनजागृतीचे काम करते. संत सेवालाल महाराज, महानायक वसंतराव नाईक आणि नायक काशिनाथ बाबा यांनी समाजासाठी दिलेले योगदान, समाजाची संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी ही संघटना कार्यरत आहे. 'गोर गवळ्या दला'चे कार्यकर्ते तांडोतांडी फिरून लोकगीतांच्या माध्यमातून समाजाच्या इतिहासाची प्रबोधनपर मांडणी करतात.
मान्यवरांच्या हस्ते सत्कार
विजय जाधव यांच्या निवडीबद्दल आयोजित सत्कार समारंभात त्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी देवठाणाचे माजी सरपंच रामराव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव राठोड, गोरसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल चव्हाण, शेतकरी नेते मनोहर राठोड, गोरसेनेचे जिल्हा सचिव अरविंद चव्हाण, वसंत सेनेचे अध्यक्ष आशिष राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष दुर्योधन जाधव, निलेश राठोड, ग्रामपंचायत सदस्य युवराज जाधव यांसह समाजातील प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध लढणार: विजय जाधव
सत्काराला उत्तर देताना विजय जाधव म्हणाले की, "माझ्यावर दिलेली जबाबदारी मोठी असून, समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा नष्ट करण्यासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी मी कटिबद्ध राहीन. लग्नकार्ये पारंपरिक रीतीरिवाजाप्रमाणे व्हावीत, जुना पेहराव आणि खानपान संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन."
No comments:
Post a Comment