Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, February 19, 2026

पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त २११ जणांचे रक्तदान

पोहरादेवी (ता. मानोरा) : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोहरादेवी येथे आयोजित महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल २११ रक्तदात्यांनी रक्तदान करून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.
गौरव बहुउद्देशीय शिक्षण मंडळ, अकोला, भक्तिधाम तीर्थक्षेत्र पोहरादेवी आणि हर्षद राठोड बहुउद्देशीय संस्था, काजळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १५ फेब्रुवारी २०२६) मंदिर परिसर व तुळजाभवानी जीवदया गौरक्षण संस्थेत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५ ते ७ या वेळेत तुळजाभवानी जीवदया गौरक्षण संस्था, वसंतनगर येथे स्वच्छता अभियानाने करण्यात आली. त्यानंतर गोपूजन, होमहवन व पूजा विधी पु. सच्चिदानंद महाराज (माहूर) यांच्या हस्ते पार पडले. यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
सकाळी ८.३० वाजता अकोला येथील ब्लड बँकेचे डॉ. संतोष सघेवार व त्यांच्या सहकाऱ्यांचा कार्यक्रमाचे आयोजक तथा संस्थाध्यक्ष संजयभाऊ राठोड व शेषराव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. मेहेर जाधव, शितल राठोड, राजेश जाधव, धीरज जाधव व संजय राठोड यांनी प्रथम रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली.
यानंतर परिसरातील विविध गावांतील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. दुपारी १ वाजता संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून व पूजन करून दुसऱ्या टप्प्यातील रक्तदान शिबिराला प्रारंभ करण्यात आला. दोन्ही ठिकाणी मिळून एकूण २११ जणांनी रक्तदान केले.
या उपक्रमाला समाजातील धर्मगुरू, संत, महंत व ग्रामस्थांचा आशीर्वाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर महाराज, काळूराम पवार, मेहेर जाधव, बाबुलाल राठोड, धीरज जाधव, अमोल राठोड, मोहन महाराज, अप्पा आडे तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व बहुजन क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर