कारखेडा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) – येथील श्री संत शंकरगिरी महाराज यांच्या 115 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथा सोहळ्याला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज, कथेचा तिसरा दिवस अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. ह.भ.प. बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांच्या प्रभावी व ओजस्वी प्रवचनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
आपल्या प्रवचनात मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले की, “आई-वडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे.” देवाच्या शोधात दूरदूर भटकण्यापेक्षा घरातील आई-वडिलांची मनोभावे सेवा केल्यास त्यातच परमेश्वराचे खरे दर्शन घडते, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
यावेळी समाजप्रबोधन करताना त्यांनी आवाहन केले की, समाजातील गरीब व दुर्बल घटकांना कधीही त्रास देऊ नका. त्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांना मदतीचा हात देणे, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हेच खरे धर्मकार्य असून तीच खरी ईश्वरसेवा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच “गाव, भाव आणि देव” या त्रिसूत्रीवर भाष्य करताना महाराजांनी सांगितले की, गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ग्रामस्थांमध्ये एकजूट, आपुलकी आणि कृतज्ञता असणे आवश्यक आहे. गाव, नातेवाईक आणि देव यांचे उपकार सदैव स्मरणात ठेवणे हीच खरी मानवतेची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कथा सोहळ्यानिमित्त भजन-कीर्तन, नामस्मरण तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक उपस्थित राहत आहेत. पुढील दिवसांतही हा कथा सोहळा भक्तिभावात सुरू राहणार असल्याने परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment