मानोरा (विठोली) , दि. २ मार्च २०२६ : कारंजा येथील लघुपाटबंधारे उपविभाग क्र. ७ मध्ये कार्यरत उपविभागीय कार्यकारी अभियंता रु. सु. मोहिते यांच्या कार्यकाळातील विविध कामांची निपक्ष व तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेने विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रु. सु. मोहिते कार्यरत असताना अनेक कामे निकृष्ट दर्जाची व अंदाजपत्रकाच्या विसंगतीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः विठोली (ता. मानोरा) येथील पूरसंरक्षण भिंतीचे काम चुकीच्या दिशेने व निकृष्ट पद्धतीने झाल्यामुळे निधीचा अपव्यय झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
इतर कामांमध्येही दर्जा न राखता कंत्राटदार व संबंधित कर्मचाऱ्यांच्या संगनमताने अनियमितता झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविल्यानंतर टाळाटाळ व मनमानी कारभार होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचे मनोहर राठोड यांनी नमूद केले आहे.
रु. सु. मोहिते यांच्या संपूर्ण कार्यकाळातील कामांची स्वतंत्र, तांत्रिक व निपक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पाटबंधारे मंत्री, पालकमंत्री वाशिम, मुख्य सचिव, अधीक्षक अभियंता शेगाव, जिल्हाधिकारी वाशिम तसेच कार्यकारी अभियंता (ल.पा. विभाग) कारंजा यांना पाठविण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment