बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे रामनवमी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देवी जगदंबा माता, संत सेवालाल महाराज व संत रामराव बापू मंदिर सेवा आश्रमात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम भगवान यांचा जन्मोत्सव पाळणा गीत, भोग-भंडारा, आरदास व महाआरतीने लाखो भाविकांच्या साक्षीने भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी “जय श्रीराम, जय सेवालाल, जय रामराव बापू” या घोषणांनी संपूर्ण पोहरादेवी नगरी दुमदुमून गेली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी निमित्त पोहरादेवी व उमरी खुर्द येथे यात्रा महोत्सव हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. गुरुवार, दि. २६ मार्च रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. संत सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिरात महंत कबीरदास महाराज यांच्या हस्ते, तसेच संत डॉ. रामराव बापू सेवा आश्रमात धर्मगुरु बाबुसिंग महाराज व भक्त शेखर महाराज यांच्या हस्ते पाळणा, भोग-भंडारा, आरदास व महाआरती करण्यात आली.
यात्रा महोत्सवासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व दिल्ली आदी राज्यांतून लाखो भाविकांनी हजेरी लावली. नांदेड, परभणी, मंठा, जालना आदी भागांतून हजारो भाविक पायदळ दिंडीद्वारे दर्शनासाठी दाखल झाले होते. मंदिर संस्थानच्या वतीने महंतांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.
या सोहळ्यास मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, तसेच तेलंगणा व कर्नाटकातील आजी-माजी मंत्री, समाजातील मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. त्यांनी देवी जगदंबा माता व संतांच्या समाधीस्थळी माथा टेकून दर्शन घेतले.
दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून दर्शन घेतले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अनेक भाविकांनी नवस फेडत शेतात, झाडाखाली व उपलब्ध जागी मुक्काम केला होता.
यात्रा महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाच्या वतीने आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी अन्नदान करून भाविकांची सेवा केली.
रामनवमी निमित्त पोहरादेवीत सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. एकूणच, भक्ती, श्रद्धा आणि समाजएकतेचा संदेश देणारा हा यात्रा महोत्सव उत्साहात पार पडला.
No comments:
Post a Comment