Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, April 15, 2026

रणरणत्या उन्हात नाफेड खरेदी केंद्रात शेतकऱ्यांना येरझारा घालण्याची पाळी. हरभरा उत्पादक शेतकरी हवालदिल

मानोरा : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नाफेड या संस्थेद्वारा नेमण्यात आलेल्या कृषी उत्पादक कंपनीद्वारा तांत्रिक कारणे दाखवून हरभरा खरेदी केली जात नसल्याने हरभरा खरेदी केव्हापासून सुरू होईल यासाठी रणरणत्या उन्हात खरेदी केंद्रावर येरझारा मारण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.
प्रति शेतकरी दोन हेक्टरमधून केवळ १३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी या केंद्रावरून घेण्यात येणार आहे. त्यापेक्षा जास्त उत्पादन असलेल्या शेतकऱ्यांनी माल कुठे विकायचा हा प्रश्न आहे.
बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण दाखवत मागील दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपासून शेतकऱ्यांची हरभरा खरेदी उपरोक्त केंद्राकडून बंद आहे.



*शेतकरी हवालदिल:*
सध्या उन्हाचा पारा ४४ अंशांवर गेला आहे. अशा रणरणत्या उन्हात शेतकरी सकाळपासून खरेदी केंद्रावर येऊन थांबत आहेत. मात्र 'आज सर्व्हर डाऊन आहे', 'बारदाना नाही', 'वरून आदेश नाही' अशी कारणे देऊन त्यांना परत पाठवले जात आहे. घरात पडून असलेला हरभरा सांभाळणे, मजुरीचा खर्च परवडत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
फलकावर खरेदीचा हमीभाव ५८७५ रुपये प्रति क्विंटल दाखवला असला तरी प्रत्यक्षात खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना ४५०० ते ४८०० रुपये दराने माल विकावा लागत आहे. यामुळे प्रति क्विंटल १००० रुपयांपेक्षा अधिक तोटा सहन करावा लागत आहे.
तातडीने पुरेसा बारदाना उपलब्ध करून खरेदी सुरू करावी.प्रति शेतकरी १३ क्विंटलची मर्यादा वाढवून संपूर्ण उत्पादन खरेदी करावे अशी मागणी कारखेडचे शेतकरी गजानन जयराम पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.
 खरेदी केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व सावलीची व्यवस्था करावी.
या संदर्भात खरेदीदार संस्थेशी संपर्क साधला असता 'वरिष्ठ स्तरावरून सूचना येताच खरेदी सुरू करू' असे मोघम उत्तर मिळाले.
हमीभावाने खरेदीची केवळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

*फोटो:* मानोरा तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्र. हरभरा खरेदी बंद असल्याने हवालदिल झालेला शेतकरी. दि. १५/०४/२०२६.

No comments:

Post a Comment

फॉलोअर